गुजरातमध्ये वर्षअखेरीला विधानसभेची निवडणूक होणार असून भाजपाच्या बालेकिल्ल्यात आम आदमी पार्टीने म्हणजेच ‘आप’ने प्रचाराला वेग दिल्यानंतर भाजपा आणि आप यांच्यामध्ये राजकीय संघर्षही तीव्र झाला आहे. अशातच दिल्लीचे मुख्यमंत्री आणि आपचे सर्वेसर्वा अरविंद केजरीवाल यांनी भाजपाच्या कार्यकर्त्यांना ‘आप’साठी काम करण्याचं आवाहन केलं आहे. राहा भाजपामध्येच काम ‘आप’साठी करा, असं केजरीवाल यांनी म्हटलं आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

केजरीवाल यांनी आज राजकोटमध्ये प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना गुजरातमधील भाजपा कार्यकर्त्यांना हे आगळं-वेगळं आवाहन केलं. “आम्हाला भाजपाचे नेते नकोत. त्यांनी ते त्यांच्या जवळ ठेवावेत. आम्हा भाजपाचे जेवढे पन्नाप्रमुख आहेत, कार्यकर्ते आहेत, गावागावांमधील, तालुक्यांमधील आणि मतदान केंद्रांवरील भाजपा समर्थक आमच्याशी जोडले जात आहेत. यामध्ये अनेक लोक फार चांगले आहेत. त्यांना मी आवाहन करतो. तुम्ही एवढ्या वर्ष भाजपाची सेवा केली, तुम्हाला काय मिळालं?तुमच्या मुलांना शाळा दिल्या यांनी? तुमच्यासाठी रुग्णालये बांधली का? तुमच्या घरामध्ये कोणी आजारी पडलं तर उपाचारांसाठी जमीन किंवा दागिने गहाण टाकावे लागतात की नाही? तुम्हालाही विजेची मोठी बिलं द्यावी लागतात की नाही भाजपावाले असले तरी?” असे प्रश्न केजरीवाल यांनी मतदारांना विचारले.

आमच्याकडे देण्यासाठी पैसे नाहीत तर पैसे तुम्ही भाजपाकडून घ्या काम मात्र आमच्यासाठी असंही केजरीवाल यांनी भाजपा कार्यकर्त्यांना सांगितलं. “मी तुम्हाला या साऱ्याचं आश्वासन देतो. तुम्हाला भाजपा सोडायची गरज नाही. तुम्ही भाजपामध्ये राहा. काम आमच्यासाठी म्हणजे आपसाठी काम करा. अनेकांना ते पैसे देतात. तर पैसे त्यांच्याकडूनच घ्या. आमच्याकडे पैसे नाहीत. आमचं सरकार आलं की आम्ही मोफत वीज देऊ तेव्हा तुम्हालाही मोफत वीज मिळेल. मी तुम्हाला २४ तास मोफत वीज देईन. तुमच्या मुलांसाठी चांगल्या शाळा उभारीन. मी मोफत शिक्षण देईन. मी तुमच्या कुटुंबावर मोफत आणि उत्तम आरोग्य सेवा देईन. मी तुमच्या घरातील महिलांना एक एक हजार रुपये देईन,” असंही केजरीवाल यांनी म्हटलं.

तसेच, “भाजपाला पुन्हा निवडून देण्यात काय फायदा आहे? तुम्ही फार स्मार्ट आहात. राहा तिथेच काम फक्त आम आदमी पार्टीचं करा,” असंही केजरीवाल म्हणाले.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Video do not quit bjp but work for aap internally kejriwal tells gujarat bjp workers scsg
First published on: 03-09-2022 at 14:14 IST