Video Showing Donald Trump Tariffs Increased Inflation In US: मर्सिडीज चँडलर या इंस्टाग्राम युजरने नुकताच अमेरिकेतील वॉलमार्ट स्टोअरमधील एक व्हिडिओ शेअर केला आहे. या व्हिडिओत अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या टॅरिफमुळे कपडे आणि इतर वस्तूंच्या किमतींमध्ये थेट वाढ होत असल्याचे म्हटले आहे.

“डोनाल्ड ट्रम्प यांचे टॅरिफ जोरात!” असे कॅप्शन असलेल्या पोस्टमध्ये चँडलर वॉलमार्ट स्टोअरमधील कपड्यांच्या जुन्या किंमतींच्या टॅग्जची नवीन किंमतींशी तुलना करताना दिसत आहेत. जुने टॅग्ज एकतर काढून टाकण्यात आले आहेत किंवा लपवण्यात आले आहेत आणि नवीन, जास्त किंमतीचे टॅग्ज जोडण्यात आले आहेत.

“मित्रांनो, टॅरिफ्स सध्या प्रत्यक्षात लागू झाले आहेत”, असे चँडलर व्हिडिओत म्हणत असल्याचे ऐकू येते. त्या पुढे म्हणतात की, “वॉलमार्टमधल्या या कपड्यांकडे पाहा. बहुतेक प्राईज टॅग्सचे खालचे भाग फाडलेले आहेत, पण एक टॅग असे आहे ज्याचा खालचा भाग अजूनही आहे. यामध्ये याची जुनी किंमत १०.९८ डॉलर्स असल्याचे दिसत आहे. पण आता त्याची किंमत वाढवून ११.९८ डॉलर्स केली आहे.”

लहान मुलांचे कपडे आधी ६.९८ डॉलर्सना होते, आता त्यांची किंमत १०.९८ डॉलर्स झाली आहे. एक बॅकपॅक, जी पूर्वी १९.९७ डॉलर्सना मिळत होती, ती आता २४.९७ डॉलर्सना विकली जात आहे, हे दाखवत चँडलर म्हणतात, “ही किंमत थेट ४ डॉलर्सनी वाढली आहे.”

“जर तुम्हाला माझ्यावर विश्वास बसत नसेल, तर तुमच्या स्थानिक दुकानात जा, मग ते वॉलमार्ट असो किंवा टार्गेट आणि हे स्वतः तपासा”, असेही या इंस्टाग्राम युजरने व्हिडिओमध्ये म्हटले आहे.

इंस्टाग्रामवरील युजर्सनी या व्हिडिओवर वेगवेगळ्या प्रकारे प्रतिक्रिया दिल्या आहेत. काहीजण गोंधळले होते, काहींनी टॅरिफवर टीका केली, तर काहींनी उपहासात्मक प्रतिक्रिया दिल्या.

“हे योग्य आहे का? आपण अजूनही महान आहोत का?” एका युजरने ट्रम्प यांच्या मेक अमेरिका ग्रेट अगेन तत्वज्ञानावर टीका करत टिप्पणी केली. दुसऱ्याने म्हटले, “आठवतंय का, जेव्हा अ‍ॅमेझॉनने चेकआउटवेळी टॅरिफ चार्जेस लावले तेव्हा ट्रम्प किती बिथरले होते? रिटेल स्टोअर्सनी देखील हे बिलामध्ये स्पष्ट दाखवायला हवं.”

टार्गेट स्टोअरच्या एका कर्मचाऱ्याने टिप्पणी केली की, “आम्ही काही दिवसांपूर्वी कपड्यांवरील किंमत टॅग काढून टाकायला सुरुवात केली आहे.” टॅरिफचे समर्थन करणाऱ्या दुसऱ्या युजरने म्हटले, “वाह, आम्हाला टॅरिफमधून अब्जावधी मिळतात आणि त्या बदल्यात आम्हाला शर्टसाठी अतिरिक्त डॉलर द्यावे लागतात. अरे नाही! जगाचा अंत होत आहे.”