व्हिडीओकॉन समुहाला ३,२५० कोटी रुपयांचे कर्ज दिल्याने आयसीआयसीआय बँकेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी चंदा कोचर अडचणीत आल्या आहेत. व्हिडीओकॉन समुहाचे अध्यक्ष वेणुगोपाळ धूत यांनी २००८ मध्ये चंदा कोचर यांचे पती दीपक कोचर यांच्यासोबत एक कंपनी सुरु केली होती आणि आयसीआयसीआय बँकेकडून कर्ज मिळताच धूत यांनी अवघ्या ९ लाख रुपयांमध्ये दीपक कोचर यांना ती कंपनी विकल्याचे समोर आले आहे. हे सर्व व्यवहार आता तपास यंत्रणांच्या रडारवर आले आहेत.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

‘इंडियन एक्स्प्रेस’ने दिेलेल्या वृत्तानुसार डिसेंबर २००८ मध्ये दीपक कोचर आणि वेणुगोपाळ धूत यांनी न्यू पॉवर रिन्यूएबल्स (एनआरपीएल) ही कंपनी सुरु केली होती. या कंपनीत धूत यांच्याकडे ५० टक्के समभाग होते. तर दीपक कोचर यांच्या कंपनीकडे उर्वरित समभाग होते. पॅसिफिक कॅपिटल असे या कंपनीचे नाव असून या कंपनीची मालकी दीपक कोचर यांच्या वडिलांकडे आहे. तर चंदा कोचर यांच्या भावाची पत्नी देखील या कंपनीत सक्रीय आहेत.

जानेवारी २००९ मध्ये धूत यांनी एनआरपीएलच्या संचालकपदाचा राजीनामा दिला आणि कंपनीचे शेअर्स २. ५ लाख रुपयांमध्ये कोचर यांना विकले. मार्च २०१० मध्ये न्यू पॉवरला धूत यांची मालकी असलेल्या सुप्रीम एनर्जी प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीकडून ६४ कोटी रुपयांचे कर्ज घ्यावे लागले. यानंतर मार्च २०१० च्या अखेरपर्यंत न्यू पॉवरमधील ९४.९९ शेअर्सचा वाटा सुप्रीम पॉवरकडे गेला.

नोव्हेंबर २०१० मध्ये धूत यांनी सुप्रीम एनर्जीचे मालकी हक्क महेश पुगलिया यांच्याकडे दिले. एप्रिल २०१३ मध्ये पुंगलिया यांनी हीच कंपनी दीपक कोचर मॅनेजिंग ट्रस्टी असलेल्या ‘पिनॅकल’च्या ताब्यात दिली. विशेष म्हणजे अवघ्या ९ लाखांमध्ये ही कंपनी विकण्यात आली.

एकीकडे हे व्यवहार होत असतानाच दुसरीकडे चंदा कोचर मुख्य कार्यकारी अधिकारी असलेल्या आयसीआयसीआय बँकेने व्हिडीओकॉन समुहाला ३,२५० कोटी रुपयांचे कर्ज दिले. एप्रिल २०१२ मध्ये हे कर्ज देण्यात आले होते. यातील २,८१० कोटी रुपयांचे थकीत होते. २०१७ मध्ये हे बुडीत कर्ज म्हणून जाहीर करण्यात आले.

कोचर कुटुंबीय आणि धूत यांच्यातील हे सर्व व्यवहार आणि बँकेचे बुडालेले कर्ज हे आता संशयाच्या भोवऱ्यात आले आहे. तपास यंत्रणांकडून या व्यवहारांची चौकशी होण्याची शक्यता आहे. ‘आयसीआयसीआय बँकेने याबाबत प्रतिक्रिया दिली आहे. आर्थिक हितसंबंधांचा प्रश्नच निर्माण होत नाही. या सर्व अफवा असून बँकेच्या संचालक मंडळाचा चंदा कोचर यांच्यावर विश्वास आहे. बँकेची प्रतिमा मलिन करण्यासाठीच अशा अफवा पसरवल्या जात असल्याचे बँकेने स्पष्ट केले आहे. तर वेणूगोपाल धूत यांनी देखील हे आरोप फेटाळून लावले आहेत.

मराठीतील सर्व अर्थसत्ता बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Videocon rs 3250 cr loan icici bank ceo chanda kochhar husband deepak kochhar venugopal dhoot
First published on: 29-03-2018 at 08:28 IST