मनी लाँड्रींग प्रकरणी सक्तवसुली संचलनालयाने(ईडी) बजावलेल्या नोटीसीला उत्तर देताना मद्यसम्राट विजय मल्ल्या यांनी चौकशीसाठी हजर राहण्यासाठी ईडीकडे १ एप्रिलपर्यंतची मुदत मागितली आहे. ईडीने विजय मल्ल्या यांना मनी लाँड्रींग प्रकरणी चौकशीसाठी १८ मार्चपर्यंत मुंबईतील ईडीच्या कार्यालयात हजर राहण्याचे समन्स धाडले होते. मात्र, विजय मल्ल्यांनी चौकशीसाठी हजेरी लावलेली नाही. शिवाय, मल्ल्या सध्या लंडनमध्ये असल्यामुळे उद्या ते चौकशीसाठी ईडीच्या कार्यालयात हजर राहतील याची शक्यता कमी होती. अखेर आज विजय मल्ल्या यांनी उद्या चौकशीसाठी उपस्थित राहणे शक्य नसल्याचे सांगत दोन आठवड्यांच्या मुदतीची ईडीकडे मागणी केली आहे.

दरम्यान, विजय मल्ल्या यांच्या किंगफिशर एअरलाईन्सच्या मालकीच्या किंगफिशर हाऊस या प्रॉपर्टीचा आज लिलाव आयोजित करण्यात आला होता. मात्र, या लिलावाला कोणीही बोली लावण्यासाठी पुढे आले नाही. मोठा गाजावाजा करत स्टेट बँकेच्या नेतृत्वाखालील बँक समूहांनी एसबीआयकॅप्स ट्रस्टी मार्फत ऑनलाईन लिलाव जाहीर केला होता. मात्र, १०० कोटींच्या किंगफिशर हाऊसच्या लिलावासाठी मूळ किंमत ही १५० कोटींची लावण्यात आल्याचे कारण सांगत कोणीही खरेदीदार बोली लावण्यासाठी पुढे आला नाही.