करोना संकटात देशभरात बेड, ऑक्सिजन आणि औषधाअभावी रुग्णांचा मृत्यू होत आहे. देशाची आरोग्य व्यवस्थेचे तिनतेरा वाजले आहेत. करोना संकटाचा सामना करण्यासाठी केंद्र सरकारच्या उपाययोजणा कमी पडल्याची टीका विरोधक करत आहेत. या देशाला संकटातून बाहेर काढण्यासाठी लोकांनी मोठ्या प्रमाणात पीएम केअर फंडामध्ये देणगी दिली. मात्र तरी देखील देशाची परिस्थिती खराब आहे. गुजरातमध्ये विजय पारिख यांच्या आईला करोना झाला होता. मात्र बेड न मिळाल्याने त्यांच्या आईचे निधन झाले. त्यांनी पीएम केअर फंडासाठी २ लाख ५१ हजार रुपयांची देणगी दिली होती.

दरम्यान, त्यांनी रोष व्यक्त करत ट्वीट करून थेट पंतप्रधान नरेंद्र मोदींना प्रश्न केला आहे. “पुढच्यावेळी किती दान द्यावे लागेल की, अशी परिस्थिती येणार नाही.”

पीएम केअर फंडामध्ये दिलेल्या देणगीचा स्क्रीनशॉट शेअर करत पारीख यांनी ट्विट केले की, २ लाख ५१ हजार रुपयांची देणगी दिल्यानंतरही मला माझ्या आईला रुग्णालयात बेड मिळू शकला नाही. कृपया मला सांगा की, मला करोनाच्या तिसर्‍या लाटेत बेड आरक्षित करण्यासाठी आणखी किती दान करावे लागेल. जेणेकरुन मला माझ्या कुटुंबातील एखादा सदस्याला वाचवता येईल. विजय पारीख यांनी ट्विट केल्यानंतर त्यांचे ट्विट सोशल मीडियामध्ये जोरदार व्हायरल होत आहे.

विजय पारीख हे पंतप्रधान नरेंद्र मोदींचे समर्थक आहेत आणि त्यांनी त्यांच्या समर्थनार्थ २०१० पासून अनेक ट्विट केले आहेत. ट्विटर वापरकर्त्यांनी त्यांच्या ट्विटचा हवाला देत भारतीय जनता पार्टीवर टीका केली आहे. परीख यांनी ट्विटमध्ये पीएमओ, राजनाथ सिंह, आरएसएस आणि स्मृती इराणी यांना टॅग केले आहे.

आणखी वाचा- “मोदींचा हिंदुत्ववाद, विज्ञानासंदर्भातील अनास्थेमुळे करोनाविरुद्धची देशाची लढाई आणखीन कठीण झाली”

करोनाच्या दुसर्‍या लाटेमुळे देशात मोठी नासधूस झाली आहे. पण आता हळूहळू दिलासा मिळालेला दिसत आहे. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने गेल्या २४ तासांतील आकडेवारी जाहीर केली आहे. आरोग्य मंत्रालयानुसार देशात मागील २४ तासांत एक लाख ९६ हजार ४२७ नवीन करोनबाधित रुग्ण आढळून आले आहेत. तर तीन लाख २६ हजार ८५० रुग्ण करोनावर मात करून घरी परतले आहेत. गेल्या काही दिवसांपासून केंद्र आणि राज्य सरकारांच्या चिंतेत भर घालणाऱ्या मृतांच्या दैनंदिन घट होत असल्याचे चित्र आहे. गेल्या २४ तासांत देशात तीन हजार ५११ मृत्यूंची नोंद झाली आहे. देशातील एकूण मृतांची संख्या तीन लाख ७ हजार २३१ वर पोहोचली आहे.