अमेरिकन अंतराळ संस्था ‘नासा’ने चांद्रयान २ मोहिमेतील विक्रम लँडर चंद्राच्या पृष्ठभागावर जेथे उतरवण्यात आले त्या लँडींग साईटचे फोटो ट्विट केले आहेत. नासाने आपल्या ट्विटर हॅण्डवरुन लुनार रिकन्सेन्स ऑर्बिटरच्या (एलआरओ) माध्यमातून काढलेले फोटो ट्विट केले असून या हाय रेझोल्यूशन इमेजेस आहेत. असं असलं तरी विक्रम लँडरचा अचूक ठावठिकाणा सांगता येणार नाही असं नासाने म्हटलं आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

नासाने केलेल्या ट्विटमध्ये चांद्रयान २ मोहिमेतील विक्रम लँडरचे हार्ड लँडींग झाल्याचे म्हटले आहे. ‘आमच्या एलआरओने भारताचे चांद्रयान २ मोहिमेतील विक्रम लँडर जिथे उतरले त्या पृष्ठभागाचे फोटो काढले आहेत. हे फोटो संध्याकाळच्या वेळी काढण्यात आल्याने या फोटोंमध्ये लँडर नक्की कुठे आहे हे स्पष्ट होऊ शकलं नाही. ऑक्टोबरमध्ये एलआरओ पुन्हा या भागावरुन जाणार आहे तेव्हा आणखीन फोटो काढले जातील. त्यावेळी या भागात चांगला प्रकाश असेल,’ असं नासाने आपल्या ट्विटमध्ये म्हटलं आहे.

नासाच्या एलआरओने काढलेले फोटो हे चंद्राच्या दक्षिण ध्रुवापासून ६०० किलोमीटर अंतरावर असणाऱ्या पृष्ठभागाचे आहेत. या भागात आतापर्यंत कोणतीही मोहिम राबवण्यात आलेली नाही.

‘नासा’चे लुनार रिकन्सेन्स ऑर्बिटर (एलआरओ) हे मागील १० वर्षांपासून चंद्राच्या कक्षेत फिरत आहे. १७ सप्टेंबर रोजी हे ऑर्बिटर विक्रम लँडर ज्या भागात उतरले त्या भागावरुन गेले. मात्र या भागामध्ये संध्याकाळ असल्याने ऑर्बिटरच्या कॅमेरात विक्रम लँडरचे स्पष्ट फोटो आले नाहीत. ‘एलआरओवरील कॅमेरांनी विक्रम लँडर ज्या भागात उतरणार होते त्या परिसराचे फोटो काढले. मात्र त्यामधून विक्रम लँडर नक्की कुठे आहे हे समजू शकलेले नाही. विक्रम लँडर या एलआरओवरील कॅमेराच्या कक्षेबाहेर असलेल्या भागामध्ये असावे किंवा ते चंद्रावरील उंच डोंगर दऱ्यांमुळे तयार झालेल्या सावलीमध्ये असण्याची शक्यता आहे,’ असे मत नासाच्या ग्रह विज्ञान विभागाच्या प्रवक्त्या जोशुआ हँडाल यांनी व्यक्त केले होते.

‘एलआरओ’ १७ तारखेला विक्रम लँडर जिथे उतरणे अपेक्षित होता त्या भागावरुन गेला. यावेळी त्या भागात संध्याकाळचा संधीप्रकाश होता. त्यामुळे तेथील बराचसा भाग धूरकट दिसत होता. कादाचित विक्रम लँडर याच भागात असेल,’ अशी शक्यता हँडाल यांनी व्यक्त केली आहे.

आता नासाचा हा ऑर्बिटर १४ ऑक्टोबर रोजी याच पृष्ठभागावरुन जाणार आहे. त्यावेळी या भागात दिवस असणार आहे. त्यामुळेच तेव्हा काढण्यात येणाऱ्या फोटोंमध्ये विक्रम लँडरचा शोध लागू शकेल अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे. इस्रोच्या नियोजित वेळापत्रकानुसार विक्रम लँडर केवळ १४ दिवस म्हणजेच २१ सप्टेंबर काम करणार होते. आता विक्रम लँडरचा संशोधनासाठी काहीच उपयोग होणार नाही. विक्रम लँडर उतरलेल्या भागामध्ये रात्र सुरु झाली आहे. चंद्राच्या या पृष्ठभागावरील रात्रीचे तापमान उणे १८० डिग्री सेल्सिअसपर्यंत खाली जाते. विक्रम लँडरने चंद्रावर दिवस असताना सर्व संशोधन करणे अपेक्षित होते. मात्र संपर्क तुटल्याने विक्रम लँडरच्या माध्यमातून कोणतेच संशोधन करण्यात इस्रोला अद्याप यश आले नाही. त्यामुळेच चंद्रावरील या भागात रात्र झाल्यानंतर पुन्हा दिवस होईपर्यंत विक्रम लँडर निषक्रिय होणार असून त्यानंतर पुन्हा त्याच्याशी कधीच संपर्क होऊ शकणार नाही.

नासाच्या एलआरओच्या मदतीने इस्रोला विक्रम लँडरशी संपर्क करता येणार नसला तरी लँडरचे नक्की काय झाले, इस्रोची चूक नक्की कुठे झाली याबद्दलची माहिती मिळण्याची शक्यता होती.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Vikram had hard landing nasa releases high resolution images of chandrayaan 2 landing site scsg
First published on: 27-09-2019 at 10:57 IST