कथितरीत्या गोहत्या केल्याबद्दल ९ महिन्यांपूर्वी हत्या करण्यात आलेल्या बिशादा गावातील मोहम्मद अखलाक याच्या कुटुंबीयांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात यावा, या मागणीसाठी गावातील काही लोकांनी न्यायालयात दाद मागितली आहे.
अखलाकच्या कुटुंबीयांनी घरी गोमांसाचा साठा केला, तसेच त्याचे सेवन केले या गुन्ह्य़ासाठी त्यांच्यावर फौजदारी प्रक्रिया संहितेच्या १५६(३) या कलमानुसार गुन्हा दाखल करण्याचे निर्देश पोलिसांना द्यावेत, असा अर्ज बिशादाच्या गावकऱ्यांनी गौतम बुद्ध नगरच्या मुख्य न्यायदंडाधिकाऱ्यांना दिला, असे अभियोजन पक्षाच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले. न्यायालय या अर्जावर १३ जूनला सुनावणी करणार आहे. या अर्जावर आपले उत्तर सादर करण्याची संधी अखलाकच्या कुटुंबीयांना देण्यात येईल व त्यानंतर गुन्हा दाखल करण्याचे निर्देश पोलिसांना देण्याची आवश्यकता आहे काय यावर न्यायालय निर्णय घेईल, असेही हा अधिकारी म्हणाले.
अखलाकच्या घरात सापडलेले मांस हे गोमांस असल्याचा अहवाल मथुरेच्या प्रयोगशाळेने दिल्यानंतर गेल्या आठवडय़ात बिशाडा येथे झालेल्या महापंचायतीत गावकऱ्यांनी अखलाकच्या कुटुंबीयांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यासाठी पोलिसांना २० दिवसांची मुदत दिली होती.