मागील अनेक दिवसांपासून मणिपूरमध्ये जातीय हिंसाचार घडत आहेत. आतापर्यंत जवळपास १२० लोकांचा यामध्ये मृत्यू झाला आहे. तर शेकडो घरं आगीच्या भक्ष्यस्थानी केली आहेत. ३ मे रोजी मेइती समुदायाने काढलेल्या रॅलीनंतर मणिपूरमध्ये वादाची ठिणगी पडली. त्यानंतर जातीय हिंसाचाराच्या अनेक घटना घडल्या. मणिपूरमधील जातीय हिंसाचार अद्याप थांबायचं नाव घेत नाहीये.
शुक्रवारी रात्री बिष्णुपूर जिल्ह्यातील क्वाक्ता आणि संघर्षग्रस्त मणिपूरच्या चुराचंदपूर जिल्ह्यातील कांगवई येथे स्वयंचलित शस्त्रांनी गोळीबार केल्याची घटना उघडकीस आली आहे. शनिवारी पहाटेपर्यंत अधूनमधून गोळीबार सुरू असल्याचे पोलीस आणि लष्कराच्या सूत्रांनी सांगितलं. आज (शनिवार) लांगोल येथे काही समाजकंठकांनी एका रिकाम्या घराला आग लावली.
हेही वाचा- अमित शाहांच्या मध्यस्तीनंतरही मणिपुरात हिंसाचार सुरूच, गोळीबार-जाळपोळीत नऊ जणांचा जागीच मृत्यू
शुक्रवारी रात्री मणिपूरमध्ये जमावाला एकत्रित करून घरांची तोडफोड आणि जाळपोळ केल्याच्या अनेक घटना घडल्याची नोंद झाली आहे. या हिंसाचाराच्या पार्श्वभूमीवर भारतीय लष्कर, आसाम रायफल्स, रॅपिड अॅक्शन फोर्स (आरएएफ) आणि राज्य पोलिसांच्या संयुक्त दलाने मध्यरात्रीपर्यंत इंफाळ पूर्व जिल्ह्यात फ्लॅग मार्च काढला. याबाबतचं वृत्त ‘एनडीटीव्ही’ने दिलं आहे.
हेही वाचा- मणिपुरात हिंसाचार भडकला; कडेकोट सुरक्षा असतानाही जमावाने केंद्रीय मंत्र्यांचं घर जाळलं
आमदाराच्या निवासस्थानी तोडफोड
तसेच काल (शुक्रवार) संध्याकाळी ‘अॅडव्हान्स हॉस्पिटल’जवळील पॅलेस कंपाऊंडमध्येही जाळपोळ करण्याचाही प्रयत्न झाला. यावेळी सुमारे एक हजार लोकांच्या जमावाने जाळपोळ आणि तोडफोड करण्याचा प्रयत्न केला. ‘आरएएफ’ने जमावाला पांगवण्यासाठी अश्रुधुरांच्या आणि रबराच्या गोळ्या झाडल्या. ज्यात दोन नागरिक जखमी झाले. मणिपूर विद्यापीठाजवळही जमाव जमल्याचं वृत्त आहे. रात्री पावणे अकराच्या सुमारास थोंगजू परिसरात २०० ते ३०० लोक जमले. त्यांनी स्थानिक आमदाराच्या निवासस्थानाची तोडफोड करण्याचाही प्रयत्न केला.
हेही वाचा- अमित शाहांच्या मध्यस्तीनंतरही मणिपुरात हिंसाचार सुरूच, गोळीबार-जाळपोळीत नऊ जणांचा जागीच मृत्यू
पोलिसांच्या शस्त्रागारावर हल्ला
शुक्रवारी रात्री आणखी एका जमावाने इंफाळ पश्चिम जिल्ह्यातील इरिंगबम पोलीस ठाण्याच्या शस्त्रागाराची तोडफोड करण्याचा प्रयत्न केला. रात्री ११ वाजून ४० मिनिटांनी ३०० ते ४०० लोकांनी पोलीस ठाण्याच्या शस्त्रागारावर हल्ला करण्याचा प्रयत्न केला. पण ‘आरएएफ’ने जमावाला पांगवलं. मणिपूरमधील हिंसाचाराच्या घटना वाढत असताना केंद्र सरकारकडून याकडे कानाडोळा केला जात असल्याचा आरोप केला जात आहे. गेल्या जवळपास ४० दिवसांपासून मणिपूरमध्ये इंटरनेट सेवा स्थगित केली आहे. त्यामुळे नागरिकांची मोठ्या प्रमाणात असुविधा होत आहे.