श्रीलंकेचे राष्ट्रपती गोताबाया राजपक्षे यांना त्यांच्या निवासस्थानातून पळ काढावा लागला आहे. शनिवारी मोठ्या संख्येने आंदोलकांनी राष्ट्रपती भवनाला घेराव घातला होता. अशा परिस्थितीत श्रीलंकेच्या राष्ट्रपतींना हा निर्णय घ्यावा लागला. हजारो आंदोलकांना पळवून लावण्यासाठी पोलिसांनी अश्रुधुराच्या नळकांड्या फोडल्यानंतर ही घटना घडली. हजारो आंदोलक त्यानंतर राष्ट्रपती भवनात घुसले.

श्रीलंकेतील आर्थिक परिस्थितीमुळे त्रस्त झालेल्या आंदोलकांनी शनिवारी राष्ट्रपती गोताबाया राजपक्षे यांच्या निवासस्थानावर ताबा मिळवला. त्यानंतर राष्ट्रपती राजपक्षे यांनी त्यांच्या निवासस्थानातून पळ काढल्याचे बोलले जात आहे. त्याचवेळी आंदोलकांनी खासदार रजिता सेनारत्ने यांच्या घरावरही हल्ला केला आहे. श्रीलंकेच्या संसदेतील पोदुजाना पेरामुना (SLPP) च्या सोळा सदस्यांनी राष्ट्रपतींना त्वरित राजीनामा देण्याची विनंती केली आहे. न्यूज एजन्सी एएफपीनुसार, श्रीलंकेचे पंतप्रधान रानिल विक्रमसिंघे यांनी तातडीची कॅबिनेट बैठक बोलावली आहे.

याआधी ११ मे रोजी तत्कालीन पंतप्रधान महिंदा राजपक्षे संपूर्ण कुटुंबासह पळून गेले होते. संतप्त जमावाने राजपक्षे यांच्या कोलंबो येथील शासकीय निवासस्थानाला वेढा घातला होता.

आंदोलक राष्ट्रपती राजपक्षे यांच्या राजीनाम्याची मागणी करत राष्ट्रपती भवनात घुसले. आंदोलक राष्ट्रपती भवनात घुसल्याने सुरक्षा दलांसोबत झालेल्या चकमकीत मोठ्या प्रमाणात लोक जखमी झाले आहेत. आंदोलकांना रोखण्यासाठी आणि पांगवण्यासाठी पोलिसांनी अश्रुधुराच्या नळकांड्या फोडल्या आणि हवेत गोळीबार केला.

काही आंदोलकांनी भिंत ओलांडली तर काहींनी मुख्य गेटमधून राष्ट्रपती भवनात प्रवेश केला. सरकारविरोधी घोषणा देत आंदोलक त्वरीत किल्ल्यासारख्या इमारतीत घुसले. पंतप्रधान महिंदा राजपक्षे यांनी राजीनामा देऊन देशाच्या पूर्वेकडील त्रिंकोमाली येथील लष्कराच्या छावणीत आश्रय घेतल्याच्या एका महिन्यानंतर ही घटना घडली आहे. श्रीलंकेच्या बिकट आर्थिक स्थितीसाठी राजपक्षे बंधूंना दोषी ठरविले जात आहे.

शनिवारीच हटवला होता कर्फ्यू

श्रीलंकेतील सर्वोच्च वकील संघ, मानवाधिकार गट आणि राजकीय पक्षांच्या वाढत्या दबावानंतर, पोलिसांनी शनिवारी सरकारविरोधी आंदोलनापूर्वी कर्फ्यू हटवला होता. सरकारविरोधी निदर्शने रोखण्यासाठी कोलंबोसह देशाच्या पश्चिम प्रांतातील सात विभागांमध्ये संचारबंदी लागू करण्यात आली होती.

कोलंबोतील राष्ट्रपतींच्या निवासस्थानाला दुपारी आंदोलकांनी घेराव घातल्याचे सांगण्यात येत आहे. यानंतर आंदोलकांनी राजपक्षे यांच्या अधिकृत निवासस्थानावर ताबा मिळवला. श्रीलंकेतील बिघडलेल्या आर्थिक संकटाच्या पार्श्वभूमीवर शनिवारी राष्ट्रपती गोताबाया राजपक्षे यांच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी सरकारी निषेध रॅली काढण्यात आली आहे. दुसरीकडे, रॅलीदरम्यान श्रीलंकेतील ​​पोलीस आणि आंदोलकांमध्ये हिंसक चकमक झाली. या हिंसक चकमकीत आंदोलक जखमी झाल्याची माहिती समोर आली आहे.

खासदाराने स्वतःवर गोळी झाडली

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

१० मे रोजी सत्ताधारी पक्षाचे खासदार अमरकीर्ती अथुकोराला यांची हत्या झाली होती. नितांबूवा येथे सरकारच्या विरोधात निदर्शने करत त्यांच्या गाडीला लोकांनी घेराव घातला. यावेळी खासदाराच्या एसयूव्ही कारमधून गोळीबार झाल्याचे लोकांनी सांगितले. यामुळे जमाव संतप्त झाला. त्यानंतर खासदार अमरकीर्ती इमारतीत लपले. हजारो लोकांनी इमारतीला वेढा घातला. त्यानंतर जमावाच्या भीतीने खासदाराने स्वतःच्या रिव्हॉल्वरने स्वतःवर गोळी झाडल्याचे बोलले जात आहे.