Vladimir Putin Statement on US sanctions on Russian oil majors : रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांनी अमेरिकेने रशियातील दोन सर्वात मोठ्या तेल कंपन्यांवर लादलेल्या निर्बंधांचा तीव्र शब्दांत निषेध केला आहे. पुतिन म्हणाले, “हे निर्बंध लादून मॉस्कोवर दबाव निर्माण करण्याचा प्रयत्न केला जात आहे. परंतु, रशिया अशा दबावाला जुमानत नाही. मॉस्को अशा दबावापुढे झुकणार नाही.”
पुतिन म्हणाले, “कुठलाही स्वाभिमानी देश अशा दबावापुढे झुकणार नाही.” अमेरिकेने रशियातील दोन सर्वात मोठ्या तेल कंपन्या, रोसनेफ्ट व लुकोइलवर कठोर निर्बंध लादले आहेत. युक्रेनमध्ये तात्काळ युद्धबंदी करण्यास रशियाने नकार दिल्यामुळे अमेरिकेने प्रत्युत्तर म्हणून हे पाऊल उचललं आहे.
मी ट्रम्प यांना आधीच इशारा दिला होता : पुतिन
व्लादिमीर पुतिन म्हणाले की “मी अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प आंना आधीच इशारा दिला होता की अशा निर्बंधांमुळे जागतिक ऊर्जा व्यापारावर गंभीर परिणाम होतील. यामुळे बाजार अस्थिर होऊ शकतो आणि तेलाच्या किमती भडकतील. याचा अमेरिकेलाही फटका बसेल. आम्ही अगदी स्पष्ट व थेट संदेश दिला होता की या निर्बंधांमुळे जगभरात तेलाच्या किमती वाढतील आणि त्यात अमेरिकेचाही समावेश आहे.”
पुतिन यांचा युरोपीय देशांवर आरोप
अमेरिका व युरोपीय राष्ट्रांनी रशियाला सातत्याने युद्धविरामाचं आवाहन केलं आहे. तर, पुतिन यांनी पाश्चिमात्य देशांवर आरोप केला आहे की “हे देश रशियाचं सार्वभौमत्व कमकुवत करू पाहतायत. पाश्चिमात्य देश रशियाला कमकुवत करण्यासाठी वेगवेगळे निर्बंध लादतायत आणि युक्रेनला लष्करी सहाय्य करत आहेत.”
युक्रेनकडून स्वागत
रशियन तेल कंपन्यांवरील निर्बंधांबाबत अमेरिकेच्या ट्रेझरी विभागाने म्हटलं आहे की हे पाऊल रशियाचं युद्ध करण्याची क्षमता कमी व्हावी, मर्यादित व्हावी यासाठी उचलण्यात आलं आहे. दुसऱ्या बाजूला युक्रेनचे अध्यक्ष वोलोदिमीर झेलेन्स्की यांनी या निर्णयाचं स्वागत केलं आहे. युक्रेनला देखील आशा आहे की या निर्णयामुळे क्रेमलिनची युद्धक्षमता कमकुवत होईल. तर, रशियन परराष्ट्र मंत्रालयाने म्हटलं आहे की हे निरुपयोगी निर्बंध आहेत. या अशा निर्णयाचा रशियन अर्थव्यवस्थेवर कुठलाही मोठा परिणाम होणार नाही.
