नवी दिल्ली : केंद्रीय निवडणूक आयोगाच्या विश्वासार्हतेवर विरोधी पक्षांनी तसेच बिगरसरकारी संस्थांनी शंका उपस्थित केल्यानंतर अखेर शनिवारी आयोगाकडून लोकसभा निवडणुकीच्या पाचही टप्प्यांतील मतदानाची संपूर्ण आकडेवारी घोषित केली. मतदान केलेल्या मतदारांचा आकडाही आयोगाने प्रसिद्ध केला असून मतांच्या आकडेवारीमध्ये कोणतीही फेरफार अशक्य असल्याची ग्वाही आयोगाने दिली आहे.

प्रत्येक मतदानकेंद्रावर झालेल्या मतदानाची आकडेवारी ४८ तासांमध्ये प्रसिद्ध करण्याची मागणी करणारी याचिका सर्वोच्च न्यायालयाने शुक्रवारी फेटाळली होती. निवडणुकीची प्रक्रिया सुरू असल्याने न्यायालय हस्तक्षेप करून आयोगाला कोणताही आदेश देणार नाही, असे स्पष्ट केले होते. शिवाय, मतदानाची आकडेवारी तातडीने देण्यासाठी आयोगाला अधिक मनुष्यबळ लागेल, असे निरीक्षणही नोंदवले होते. मात्र, न्यायालयाच्या सुनावणीनंतर दुसऱ्याच दिवशी, शनिवारी केंद्रीय निवडणूक आयोगाकडून पाचही टप्प्यांतील प्रत्येक मतदारसंघात मतदान केलेल्या मतदारांची आकडेवारी प्रसिद्ध करण्यात आली. वास्तविक, ही आकडेवारी प्रत्येक मतदान केंद्रावरील उमेदवारांच्या निवडणूक प्रतिनिधींना ‘१७-क’ या अर्जाच्या विहित नमुन्याद्वारे दिली जाते. तरीही ही आकडेवारी संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्यास आयोगाने न्यायालयात नकार दिला होता. शनिवारी हीच आकडेवारी नागरिकांसाठी उघड करण्यात आली.

हेही वाचा >>>“माझ्या वडिलांनी आधी बलात्कार केला, मग मी आणि…”, हमासच्या बाप-लेकाचे इस्रायली महिलेशी राक्षसी कृत्य

मतदानाच्या पहिल्या दोन टप्प्यांतील मतदानाची अंतिम टक्केवारी आयोगाने ११ दिवसांनी प्रसिद्ध केल्यानंतर काँग्रेसचे पक्षाध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी इंडियातील घटक पक्षांच्या नेत्यांना पत्र पाठवून केंद्रीय निवडणूक आयोगाच्या कार्यपद्धतीवर व विश्वासार्हतेवर शंका घेतली होती. त्यानंतर ‘असोसिएशन फॉर डेमोक्रॅटिक रिफॉर्म’ (एडीआर) या निवडणूक सुधारणेसंदर्भात कार्यरत असलेल्या संस्थेने सर्वोच्च न्यायालयात धाव घेत मतदान केलेल्या मतदारांचा आकडा व टक्केवारी दोन दिवसांमध्ये जाहीर करण्याची मागणी केली होती. केंद्रीय निवडणूक आयोगाच्या कार्यपद्धतीवर सातत्याने हल्लाबोल होत असल्याने आयोगाने मतदारांची आकडेवारी देऊन कारभार निष्पक्ष असल्याचे स्पष्टीकरण देण्याचा प्रयत्न केला आहे. निवडणूक प्रक्रियेत बाधा आणण्यासाठी बनावट व खोडसाळ आरोप केल्याचे मत आयोगाने व्यक्त केले.

महत्त्वाचे मुद्दे

●केंद्रीय निवडणूक आयोगाकडून पाचही टप्प्यांतील मतदारसंघनिहाय मतदारांची आकडेवारी जाहीर. त्यामध्ये मतदानाचा आकडा, मतांच्या टक्केवारीचा समावेश.

१७-क अर्जाद्वारे सर्व उमेदवारांच्या निवडणूक प्रतिनिधींना मतदानाच्या दिवशीच मतांचा माहिती-विदा दिला गेल्याने तो कोणीही बदलू शकत नाही.

मतदारांच्या मतदानाचा माहिती-विदा उमेदवारांकडे नेहमीच उपलब्ध असतो. नागरिकांसाठी तो ‘व्होटर टर्नआउट’ अॅपवरही पाहता येऊ शकतो.

सर्वोच्च न्यायालयाच्या सुनावणीनंतर सर्व माहिती-विदा प्रसिद्ध.

आयोगाचे म्हणणे

सर्वोच्च न्यायालयाने केंद्रीय निवडणूक आयोगाच्या कार्यपद्धतीमध्ये हस्तक्षेप न करण्याचा निर्णय घेतल्यानंतरआयोगाला मोठा आधार मिळाला असून लोकशाहीच्या बळकटीसाठी आयोगालाही मोठी जबाबदारी सांभाळावी लागेल. त्यामुळे आयोगाने प्रत्येक मतदारसंघातील मतदारांची पूर्ण संख्या जाहीर करण्याचा निर्णय घेतला आहे. मतदानाची संपूर्ण प्रक्रिया पारदर्शक व सहभागात्मक आहे. मतदानाची आकडेवारी जाहीर करण्यात विलंब झालेला नाही.