महाराष्ट्रात राहुल गांधी यांनी स्वातंत्र्यवीर सावरकरांबाबत केलेल्या वक्तव्यावरून सध्या वाद चालू असताना दुसरीकडे राजधानी दिल्लीत एका व्हायरल व्हिडीओवरून राजकारण सुरू झालं आहे. हा व्हिडीओ तिहार जेलमधला असून ईडीनं आर्थिक गैरव्यवहार प्रकरणी अटक केलेले दिल्लीचे मंत्री आणि आम आदमी पक्षाचे आमदार सत्येंद्र जैन यांचा आहे. या व्हिडीओमध्ये सत्येंद्र जैन तुरुंगात मसाज घेताना दिसत आहेत. या पार्श्वभूमीवर भाजपानं आम आदमी पक्षावर टीकास्र सोडलेलं असताना त्यावरून आता दिल्लीच्या सत्ताधाऱ्यांनी स्पष्टीकरणादाखल बाजू मांडली आहे. यामध्ये भाजपाचे सर्व आरोप आपनं फेटाळले आहेत.

नेमका काय आहे वाद?

भाजपाचे राष्ट्रीय प्रवक्ते शेहजाद पूनावाला यांनी त्यांच्या ट्विटर अकाऊंटवरून एक व्हिडीओ ट्वीट केला. या व्हिडीओमध्ये अटकेत असलेले सत्येंद्र जैन एका व्यक्तीकडून मसाज घेताना दिसत आहेत. हा व्हिडीओ पोस्ट करून पूनावाला यांनी आपवर टीकास्र सोडलं. “सजा घेण्याऐवजी सत्येंद्र जैन यांना व्हीव्ही आयपी मजा मिळत आहे. तिहार जेलमध्ये मसाज दिला जातोय. गेल्या पाच महिन्यांत जामीनही न मिळालेल्या हवालाबाज व्यक्तीला मसाज मिळतोय. आपच्या कार्यकाळात तिहार जेलमध्ये नियमांचं सर्रास उल्लंघन केलं जात आहे”, अशी टीका पूनावाला यांनी ट्वीटमधून केली आहे.

दरम्यान, यानंतर भाजपाचे गौरव भाटिया यांनीही आम आदमी पक्षाला लक्ष्य केलं. “कट्टर बेईमान ठग नियम मोडून तिहार जेलमध्ये मसाज घेत आहे. त्यांना तुरुंगात जाऊन आता पाच महिने झाले, मात्र तरीही त्यांचं मंत्रीपद काढून घेतलेलं नाही. हा व्हिडीओ पाहिल्यानंतर आम्ही तुम्हाला प्रश्न विचारत आहोत. अरविंद केजरीवाल आता कुठे लपून बसले आहेत?” असा सवाल करत पत्रकार परिषदेतून मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्यावर हल्लाबोल केला आहे.

“फक्त भाजपाच असे प्रकार करू शकते”

दरम्यान, भाजपाच्या या टीकेनंतर आम आदमी पक्षाकडून उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया यांनी बाजू मांडली आहे. “ही मसाज सत्येंद्र जैन यांच्या आजारपणावरील उपचारांचा एक भाग आहे. एका आजारी व्यक्तीवरील उपचारांचं सीसीटीव्ही फूटेज लीक करून त्यावर वाईट विनोद करण्याचं काम फक्त भाजपाच करू शकते. त्यांच्या मणक्याला दुखापत झाली होती. हे ऑन रेकॉर्ड आहे”, असं मनीष सिसोदिया यांनी माध्यमांशी बोलताना सांगितलं आहे.

ED ने अटक केलेल्या ‘आप’च्या मंत्र्याला तिहारमध्ये VVIP ट्रीटमेंट; तुरुंगामधील मसाजच्या CCTV फुटेजमुळे खळबळ

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

सत्येंद्र जैन यांच्या या व्हिडीओमध्ये दिल्लीच्या राजकीय वर्तुळात आरोप-प्रत्यारोपांचं राजकारण सुरू झालं आहे.