देशात २०२४ साली होणाऱ्या लोकसभा निवडणुकीसाठी विरोधी पक्षांच्या एकजुटीचा प्रयत्न सुरू आहे. त्याच पार्श्वभूमीवर बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार आणि उपमुख्यमंत्री तेजस्वी यादव यांनी बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांची आज ( २४ एप्रिल ) भेट घेतली. ‘भाजपाला हिरो ते झिरो करायचं आहे,’ असा हल्लाबोल ममता बॅनर्जी यांनी बैठकीनंतर प्रसारमाध्यमांशी बोलताना केला.

ममता बॅनर्जी म्हणाल्या, “जयप्रकाश यांनी बिहारमधून आपल्या आंदोलनाला सुरूवात केली होती. त्यामुळे विरोधी पक्षांमधील एकतेचा संदेश देण्यासाठी बिहारमध्ये एक बैठक झाली पाहिजे. याबाबत नितीश कुमार यांच्याशी चर्चा झाली आहे. आमचा उद्देश भाजपाचा पराभव करणं आहे. माध्यमे, गुंडगिरीच्या माध्यमातून भाजपा हिरो बनला आहे,” अशी टीका बॅनर्जींनी केली आहे.

हेही वाचा : “मुस्लिमविरोधी वक्तव्य करण्याशिवाय…”, ओवैसींची भाजपावर टीका; म्हणाले, “मागास मुस्लिमांचं आरक्षण…”

बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी सांगितलं, “आगामी लोकसभा निवडणुकीपूर्वी विरोधी पक्षांना एकत्र आणण्याबाबत बैठकीत चर्चा झाली. देशहितासाठी आम्ही एकत्र येत आहोत. आताच्या सरकारला विकास करायचा नाही. ते फक्त स्वत:च्या प्रसिद्धीसाठी काम करत आहेत,” असं नितीश कुमार म्हणाले.

हेही वाचा : अवघ्या ३६ तासांत ७ शहरं आणि ५३०० किमीचा प्रवास! पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या दोन दिवसीय दौऱ्याला सुरुवात

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

यापूर्वी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार, तेलंगणाचे मुख्यमंत्री के चंद्रशेखर राव आणि तामिळनाडूचे मुख्यमंत्री एम.के स्टॅलिन यांनी विरोधी पक्षांना एकत्र आणण्यासाठी प्रयत्न केले होते. आता नितीश कुमार यांनी विरोधकांना एकत्र आणण्यासाठी पुढाकार घेतल्याचं दिसत आहे. अलीकडेच नितीश कुमार यांनी समाजवादी पक्षाचे अध्यक्ष अखिलेश यादव आणि ममता बॅनर्जी यांची भेट घेतली होती.