अजमेरच्या ख्वाजा गरीब नवाज दर्ग्याचा एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. शुक्रवारी रात्री उशिरा मुसळधार पावसाचे पाणी रस्त्यावरून वाहत असल्याचे तसंच गाड्या वाहून जात असल्याचे चित्र या व्हिडीओमध्ये दिसत आहे. एवढंच नाही तर, अक्षरश: माणसंसुद्धा या पाण्यात वाहून जात असल्याचे दिसत आहे.

निजाम गेटजवळ एक भाविक घसरल्याने पाण्याच्या जोरदार प्रवाहामुळे तो वाहून जाऊ लागला. मात्र हॉटेलच्या कर्मचाऱ्यांनी त्याला तातडीने वाचवले.

दरम्यान, शुक्रवारी राजस्थानच्या अनेक भागात मुसळधार पाऊस पडला. त्यामुळे सखल भागात पाणी साचले आणि अनेक जिल्ह्यांमध्ये रेड अलर्टही जारी करण्यात आला आहे. राजसमंद जिल्ह्यातील कुंभलगड भागात वाढत्या पाण्याच्या पातळीमुळे रस्ता वाहतूक बंद झाली. या पाण्यात अनेक शाळकरी मुलांना घेऊन जाणारी एक स्कूल व्हॅनही अडकली. स्थानिक रहिवाशांनी तातडीने मदत करत सर्व मुलांना आणि इतर दोन व्यक्तींना सुरक्षितपणे तिथून बाहेर काढले.

“मुसळधार पावसामुळे अनेक शाळेतील मुले त्यांच्या स्कूल व्हॅनमध्येच थांबल्याने अडकली. स्थानिकांनी मदत करत मुलांना आणि इतर दोघांना वाचवले”, अशी माहिती उपविभागीय अधिकारी गोविंद सिंग रतनू यांनी दिली. अजमेर या शहराचे या पावसात सर्वाधिक नुकसान झाले आहे. तिथे जवाहरलाल नेहरू सरकारी रूग्णालयात पावसाचे पाणी शिरले आणि कामकाज विस्कळीत झाले.

हवामान विभागाने जारी केलेल्या रेड अलर्टनंतर अजमेर महानगरपालिकेचे आरोग्य अधिकारी पृथ्वीराज सिंह यांनी नागरिकांना घरातच राहण्याचे आवाहन केले आहे. महानगरपालिका आयुक्तांच्या निर्देशानुसार, पाणी साचण्याची शक्यता असलेल्या भागात अभियंते, स्वच्छता कर्मचारी आणि आरोग्यसेवा कर्मचाऱ्यांचे पथक तैनात करण्यात आले आहे.


पुष्करमध्येही गेल्या अनेक तासांपासून पाऊस सुरू आहे. भारतीय हवामान विभागाने पूर्व आणि पश्चिम राजस्थानच्या काही भागात अत्यंत मुसळधार पावसाचा अंदाज वर्तवला आहे. अजमेर, भिलवाडा, बुंदी, कोटा, टोंक आणि पालीसाठी रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे. राजसमंदसह दहा जिल्ह्यांसाठी ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

दरम्यान, वायव्य मध्य प्रदेश आणि लगतच्या नैऋत्य उत्तर प्रदेशावरील कमी दाबाचा पट्टा पश्चिम-वायव्येकडे सरकत आहे आणि पुढील २४ तासांत त्याचा पूर्व राजस्थानवर परिणाम होण्याची शक्यता आहे. पावसाचा फटका बसलेल्या जिल्ह्यांमध्ये बचाव आणि मदत कार्य सुरू आहे.