पीटीआय, नवी दिल्ली
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर पाकिस्तानची जलकोंडी करण्याचा प्रयत्न भारताने सुरू केला आहे. सिंधू जलकरार रद्द करण्यात आल्यानंतर आता चिनाब नदीवरील बागलिहार धरणातून पाण्याचा प्रवाह रोखला आहे. झेलम नदीवरील किशनगंगा धरणातही अशाच प्रकारची योजना आखण्यात येत आहे.
जम्मूमधील रामबनमधील बागलिहार आणि उत्तर काश्मीरमधील किशनगंगा ही जलविद्याुत धरणे भारताला पाणी सोडण्याच्या वेळेचे नियमन करण्याची क्षमता देतात. जागतिक बँकेच्या मध्यस्थीने १९६०पासून भारत आणि पाकिस्तानमधील सिंधू नदी आणि तिच्या उपनद्यांचा वापर नियंत्रित केला आहे. बागलिहार धरण हा दोन्ही देशांमधील दीर्घकाळापासून वादाचा मुद्दा आहे, पाकिस्तानने यापूर्वी जागतिक बँकेची मध्यस्थी करण्याची मागणी केली आहे. किशनगंगा धरणाची कायदेशीर आणि राजनैतिक तपासणी करण्यात आली होती.
भारतीय जहाजांना पाकिस्तानात बंदी
इस्लामाबाद : पहलगाम दहशतवादी हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर भारताने पाकिस्तानवर जहाजबंदी केल्यानंतर पाकिस्ताननेही भारतीय ध्वजधारी जहाजांना त्यांच्या बंदरांमध्ये प्रवेश करण्यास बंदी घातली. पाकिस्तानातून येणाऱ्या वस्तूंच्या आयातीवर आणि पाकिस्तानी जहजांच्या बंदरामंध्ये प्रवेशावर शनिवारी भारताने बंदी घातली. प्रत्युत्तरादाखल पाकिस्तानने शनिवारी रात्री भारतीय जहाजांवर प्रवेशबंदी घातली.
विवाहाबद्दल बडतर्फ जवानाचा खुलासा
जम्मू : ‘सीआरपीएफ’चे जवान मुनीर अहमद यांनी पाकिस्तानी महिलेशी केलेला विवाह लपवल्याबद्दल त्यांच्यावर शनिवारी बडतर्फीची कारवाई करण्यात आली. मात्र, गेल्या वर्षी ‘सीआरपीएफ’च्या मुख्यालयाकडून परवानगी मिळाल्यानंतरच एका महिन्याने पाकिस्तानी नातेवाईक महिलेशी विवाह केला होता असा खुलासा मुनीर अहमद यांनी रविवारी पत्रकार परिषदेत केला. तसेच बडतर्फीच्या निर्णयाला न्यायालयात आव्हान देणार असल्याचेही अहमद यांनी सांगितले.
सरकारकडे हल्ल्याची आगाऊ सूचना?
‘इंडियन एक्स्प्रेस’च्या वृत्तानुसार, हल्ल्यापूर्वी १० ते १५ दिवस आधी सुरक्षा दले आणि सरकारला संभाव्य हल्ल्याची माहिती मिळाली होती. या माहितीनुसार, श्रीनगर आणि परिसरांमधील हॉटेलमध्ये पर्यटकांना लक्ष्य करणारा दहशतवादी हल्ला होण्याची शक्यता होती. हल्ल्यामध्ये सहभागी असलेल्या चार दहशतवाद्यांपैकी दोघे दक्षिण काश्मीरचे होते. ते पर्यटकांवर नजर ठेवून असल्याची शक्यता असल्याचे एका वरिष्ठ अधिकाऱ्याने नाव गुप्त ठेवण्याच्या अटीवर सांगितले. मिळालेल्या माहितीनुसार, श्रीनगरमधील दल सरोवर आणि मुघल बागांच्या आसपास सुरक्षा व्यवस्था कडक ठेवण्यात आली होती. त्यासाठी जाब्रावान डोंगररांगांच्या पायथ्याशी सुरक्षा वाढवली होती. हल्ल्याच्या काही दिवस आधीच पोलीस महासंचालकांसह वरिष्ठ पोलीस अधिकारी खोऱ्यात तळ ठोकून होते असेही सांगण्यात आले.
हेरगिरीच्या आरोपावरून दोघांना अटक
अमृतसर : अमृतसरमधील लष्करी छावणी क्षेत्र आणि हवाई तळांची संवेदनशील माहिती आणि छायाचित्रे उघड केल्याबद्दल अमृतसर ग्रामीण पोलिसांनी पलक शेर मसीह आणि सूरज मसीह या दोघांना अटक केली. त्यांच्यावर हेरगिरी केल्याचा आरोप ठेवण्यात आला आहे. या दोन्ही आरोपींचे पाकिस्तानी गुप्तहेरांशी संबंध असल्याचे प्राथमिक तपासात आढळून आले आहे, असे पोलीस अधिकाऱ्यांनी सांगितले. अमृतसहर मध्यवर्ती कारागृहात बंद असलेल्या हरप्रीत सिंग ऊर्फ पिट्टू याच्या माध्यामातून आरोपींचे पाकिस्तानी हेरांशी संबंध स्थापित झाले होते. अधिकृत गोपनीयता कायद्यांतर्गत त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला असून तपास सुरू आहे, असे पोलिसांनी सांगितले.