पहलगामच्या हल्ल्यानंतर भारतीय लष्कराने राबविलेल्या ऑपरेशन सिंदूरद्वारे पाकिस्तान आणि पाकव्याप्त काश्मीरमधील दहशतवाद्यांचे तळ उध्वस्त करण्यात आले. याचबरोबर आता पाकिस्तानची अनेक लढाऊ विमाने पाडल्याचीही माहिती समोर आली आहे. भारतीय हवाई दलाचे प्रमुख एपी सिंग यांनी ऑपरेशन सिंदूरच्या यशाची माहिती देत असताना अमेरिकन बनावटीचे एफ-१५, चिनचे जेएअफ-१७ अशा विमानांसह ४ ते ५ विमाने पाडली गेल्याचे म्हटले आहे.

९३ व्या हवाई दलाच्या दिनानिमित्त आयोजित समारंभात बोलत असताना त्यांनी ही माहिती दिली. तसेच भारताची विमाने पाडल्याचा पाकिस्तानचा दावा हास्यास्पद असून त्या त्यांच्या ‘मनोहर कहानियाँ’ असल्याचा टोलाही एपी सिंग यांनी लगावला आहे.

भारतीय हवाई दलाचे प्रमुख एपी सिंग म्हणाले, भारतीय हवाई दलाने पाकिस्तानच्या अनेक हवाई तळांना लक्ष्य केले. यामुळे पाकिस्तानची रडार प्रणाली, कमांड सेंटर, धावपट्टी, हँगर आणि जमिनीवरून हवेत मारा करणाऱ्या क्षेपणास्त्र यंत्रणेचे नुकसान झाले. तसेच या कारवाई दरम्यान सी-१३० क्लास एअरक्राफ्ट आणि एक उच्च दर्जाचे सर्व्हिलन्स एअरक्राफ्टही उध्वस्त करण्यात आले.

Sana Mir Pakistan Sports Controversy
भारताविरुद्धच्या सुपर फोर सामन्यादरम्यान साहिबजादा फरहान आणि हरिस रौफ (Pakistani Cricketers Haris Rauf and Sahibzada Farhan) यांनी आक्षेपार्ह हावभाव केले होते.

हवाई दलाच्या दिनानिमित्त आयोजित पत्रकार परिषदेत बोलत असताना एअर चीफ मार्शल एपी सिंग म्हणाले, पाकिस्तानच्या नुकसानाबद्दल सांगायचे झाल्यास, आम्ही मोठ्या संख्येने त्यांच्या हवाई तळांना लक्ष्य केले. त्यांच्या यंत्रणांवर हल्ले केले. यामुळे किमान चार ठिकाणी रडार, दोन ठिकाणी कमांड अँड कंट्रोल सेंटर, दोन धावपट्ट्यांचे मोठे नुकसान झाले. पाकिस्तानच्या ४ ते ५ लढाऊ विमानांचे नुकसान झाले. बहुधा त्यात एफ-१६ विमानाचाही समावेश आहे. कारण हल्ला केलेली जागा एफ-१६ विमानाच्या देखरेखेची होती.

३०० किमींहून अधिक अंतरावर हल्ला

एअर चीफ मार्शल पुढे म्हणाले, “आमच्याकडे ३०० किमीहून अधिक अंतरावर लांब पल्ल्याचे हल्ले केल्याचे स्पष्ट पुरावे आहेत. भारतीय हवाई दलाच्या हल्ल्यात AEW&C एअरक्राफ्ट किंवा महत्त्वाचे विमान पाडण्यात आले. तसेच एफ-१६ आणि जेएफ-१७ या श्रेणीतील पाच हायटेक लढाऊ विमानांचेही नुकसान केल्याचे पुरावे आहेत.”

भारताने केलेली कामगिरी ऐतिहासिक अशी होती. ऑपरेशन सिंदूरदरम्यान हवाई दलाने पाकिस्तानात ३०० किलोमीटरपेक्षा जास्त लांबीचा सर्वात मोठा यशस्वी क्षेपणास्त्र हल्ला केला होता. ज्यामुळे पाकिस्तानच्या कारवाया लक्षणीयरित्या नियंत्रणात ठेवण्यात आल्या. आम्ही अलीकडेच खरेदी केलेले लांब पल्ल्याचे क्षेपणास्त्र त्यांच्या सीमेच्या आत पोहोचवू शकलो. इतिहासात पहिल्यांदाच सीमेच्या आत ३०० किलोमीटरपेक्षा जास्त अंतर गाठण्यात आले, असेही एअर चीफ मार्शल एपी सिंग म्हणाले.

पाकिस्तानच्या दाव्यांची हवा काढली

पाकिस्तानचे पंतप्रधान शाहबाज शरीफ यांनी काही दिवसांपूर्वीच संयुक्त राष्ट्रांच्या महासभेत बोलत असताना भारताची सहा ते सात लढाऊ विमाने पाडल्याचा दावा केला होता. मात्र त्याचे पुरावे त्यांनी आजवर दिलेले नाहीत. त्यानंतर काही दिवसांतच एअर चीफ मार्शल यांनी त्यांच्या दाव्यातील हवा काढली आहे.

विशेष म्हणजे, आशिया चषकात भारत-पाकिस्तान सामन्यादरम्यान पाकिस्तानचा क्रिकेटपटू हरिस रौफनेही हाच संदर्भ पकडून आक्षेपार्ह हावभाव केले होते.