मुंबई हल्ल्यातील गुन्हेगार अतिरेकी अजमल कसाब याला पुण्यातील येरवडा कारागृहात फाशी देण्यात आल्याबाबत पाकिस्तानने अत्यंत सावध प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. आम्ही सर्व स्वरूपातील दहशतवादाचा निषेध करतो व दहशतवाद नष्ट करण्यासाठी इतर देशांशी सहकार्य करण्याची आमची तयारी आहे, असे पाकिस्तानने म्हटले आहे.
पाकिस्तानच्या परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते मोझम खान यांनी सांगितले की,आम्ही सर्व प्रकारच्या दहशतवादाचा निषेध करतो. २६ नोव्हेंबर २००८ रोजी मुंबईत झालेल्या दहशतवादी हल्ल्याच्यावेळी जिवंत पकडण्यात आलेला एकमेव अतिरेकी अजमल कसाब याला फाशी दिल्याबाबत त्यांनी ही प्रतिक्रिया व्यक्त केली.
दहशवादाचा प्रसार रोखण्यासाठी सर्व देशांशी सहकार्य करण्यास व त्यांच्या समवेत काम करण्यास आमची तयारी आहे, असे त्यांनी निवेदनात म्हटले आहे. सर्व प्रकारच्या दहशतवादाचा आम्ही निषेध करतो व आमची हीच भूमिका सातत्याने राहिली आहे असे निवेदनात म्हटले आहे.
कसाबला फाशी देण्याचा निर्णय पाकिस्तानला अगोदर कळवण्यात आला होता, पण पाकिस्तानने ते पत्रच स्वीकारले नाही. या भारताच्या दाव्याबाबत विचारले असता खान म्हणाले की, या बातम्या चुकीच्या व निराधार आहेत.
भारताच्या पाकिस्तानातील उप उच्चायुक्तांनी काल सायंकाळी परराष्ट्र कार्यालयात जाऊन कसाबला फाशी देण्यात येणार असल्याची टिप्पणी देण्याचा प्रयत्न केला व त्यांनी दक्षिण आशिया विभागाचे महासंचालक यांना कसाबच्या फाशीची टिप्पणी असलेले पत्र दिले व त्यांनी ते स्वीकारले, असे खान यांनी सांगितले.