India-Pakistan Ceasefire : भारत-पाकिस्तानमधील संघर्षात अमेरिकेने मध्यस्ती केल्याने शस्त्रविराम झाल्याचा दावा अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी याआधी अनेकदा केला. त्यांच्या या दाव्यावर भारताने वेळोवेळी प्रत्युत्तर दिले असले तरीही डोनाल्ड ट्रम्प त्यांच्या या मुद्द्यावर ठाम आहेत. आम्ही चर्चा केली, त्यामुळेच शस्त्रविराम होऊ शकला, या वक्तव्याचा त्यांनी पुन्हा एकदा पुनरुच्चार केला आहे. ते माध्यमांशी बोलत होते.
“आम्ही भारत-पाकिस्तान यांच्यातील लढाई थांबली, अन्यथा ही लढाई अणूयुद्धापर्यंत पोहोचली असती. भारतातील नेते, पाकिस्तानातील नेते आणि अमेरिकेच्या माझ्या नागरिकांचे मला आभार मानायचे आहेत. आम्ही व्यापारासंदर्भात बोललो, जे देश एकमेकांबरोबर भांडत आहेत, त्यांच्याबरोबर आम्ही व्यापार करू शकत नाही, अशी आम्ही ठाम भूमिका घेतली. भारत आणि पाकिस्तानातील नेते ग्रेट आहेत. त्यांनी परिस्थितीचं गांभीर्य समजावून घेतलं, त्यांनी मान्यही केलं आणि त्यांनी सर्व थांबवलं”, असं डोनाल्ड ट्रम्प म्हणाले.
आमच्याकडे सर्वोत्तम लष्कर
“इतरांनाही लढण्यापासून आम्ही थांबवत आहोत. कारण, आम्ही इतरांपेक्षा जास्त चांगले लढू शकतो. जगातील सर्वांत सर्वोत्तम लष्कर आमच्याकडे आहे. जगातील सर्वात शक्तीशाली नेते आमच्याकडे आहेत”, असंही ते पुढे म्हणाले.
भारत-पाक संघर्ष थांबवल्याचा मला अभिमान
“मला वाटते की ज्या कराराचा मला सर्वात जास्त अभिमान आहे तो म्हणजे भारत आणि पाकिस्तान यांच्याबरोबर व्यापार. या दोन्ही देशातील अणुयुद्ध आम्ही तोफांनी नव्हे तर व्यापाराने थांबवले आहे. संघर्षात सहसा तोफगोळ्यांचा वापर करतात, पण आम्ही व्यापाराद्वारे हा संघर्ष थांबवू शकलो. म्हणून मला त्याचा खूप अभिमान आहे. कोणीही याबद्दल बोलत नाही. परंतु पाकिस्तान आणि भारत यांच्यात एक अतिशय वाईट संभाव्य युद्ध चालू होते. पण आता सर्वकाही ठीक आहे”, असंही अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प म्हणाले.
जम्मू काश्मीरच्या पहलगाम येथे २२ एप्रिल रोजी दहशतवाद्यांनी पर्यटकांना लक्ष्य केलं. या हल्ल्यात २५ भारतीय आणि एका नेपाळी पर्यटकाचा मृत्यू झाला. अकस्मित झालेल्या या हल्ल्यामुळे भारताकडूनही तीव्र प्रतिक्रिया दिली जाईल, असा इशारा भारताकडून देण्यात आला होता. त्या दरम्यान, ६ आणि ७ मेच्या मध्यरात्री भारताने पाकिस्तानच्या दहशतवादी तळांवर हल्ले केले. या हल्ल्यात १०० हून अधिक दहशतवादी मारले गेल्याचा दावा केला जात आहे. दरम्यान, १० मेपर्यंत हा संघर्ष सुरूच होता.
दोन्ही देशांकडून कारवाया सुरू असताना मोठ्या प्रमाणात जीवित आणि वित्तहानी झाली. दरम्यान, अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी त्यांच्या सोशल मीडिया खात्यावरून दोन्ही देशांनी शस्त्रविरामावर स्वाक्षरी केल्याचं सांगितलं. भारत आणि पाकिस्तानातील संघर्षाबाबत तिसऱ्या देशाच्या नेत्याने माहिती देणे, याबाबत साशंकता व्यक्त केली गेली. मात्र, त्यानंतर तात्काळ भारताने शस्त्रविरामाची घोषणा केली.
परंतु, या दोन्ही देशांदरम्यान झालेल्या शस्त्रविरामाबाबत सर्वांत प्रथम अमेरिकेकडून का कळवण्यात आले हा प्रश्न भारत, पाकिस्ता आणि अमेरिका अशा तिन्ही देशांमधून उपस्थित करण्यात आला. दरम्यान, भारत-पाकिस्तानातील संघर्षात अमेरिकेची कोणतीही भूमिका नसून दोन्ही देशांनी समजुतीने हा करार केल्याची भूमिका भारताने पररराष्ट्र मंत्रालयाच्या पत्रकार परिषदेत मांडली. परंतु, भारताने भूमिका स्पष्ट केली असली तरीही अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प आपल्या दाव्यावर ठाम आहे. दोन्ही देशांना व्यापारबंदीची धमकी दिल्यामुळेच या दोन्ही देशांनी शस्त्रविराम केल्याचं त्यांचं म्हणणं आहे.