नवी दिल्ली : विरोधी पक्षांच्या सदस्यांनी सभागृहात गोंधळ चालूच ठेवला तर नाइलाजाने केंद्र सरकारला गदारोळातच महत्त्वाची विधेयके चर्चा न करताच संमत करावी लागतील, असा इशारा केंद्रीय संसदीय कामकाजमंत्री किरेन रिजिजू यांनी सोमवारी दिला.
संसदेच्या पावसाळी अधिवेशनाच्या तिसऱ्या आठवड्याच्या पहिल्या दिवशी, सोमवारीदेखील दोन्ही सभागृहे कोणत्याही कामकाजाविना दिवसभरासाठी तहकूब करण्यात आले. त्यानंतर रिजिजू यांनी केंद्र सरकारची भूमिका स्पष्ट केली.
झारखंड मुक्ती मोर्चाचे संस्थापक व राज्याचे माजी मुख्यमंत्री शिबू सोरेन यांच्या निधनामुळे राज्यसभेत त्यांना श्रद्धांजली वाहून कामकाज दिवसभरासाठी तहकूब करण्यात आले. लोकसभेत सोरेन यांना आदरांजली वाहिल्यानंतर कामकाज सुरू झाले. पण, बिहारमधील ‘एसआयआर’वरून विरोधी पक्षांनी पुन्हा गोंधळ घातला. केंद्रीय निवडणूक आयोगाच्या बिहारमधील मतदारयाद्यांच्या विशेष सखोल फेरसतपासणी मोहिमेला विरोधकांचा तीव्र विरोध असून त्यावर सभागृहांत चर्चा केली पाहिजे, अशी मागणी ते सातत्याने करत आहेत. यासंदर्भात काँग्रेसने दोन्ही सदनांमध्ये चर्चेसाठी नोटीसही दिली आहे. लोकसभेचे कामकाज सकाळी अकरानंतर लगेचच दुपारी दोन वाजेपर्यंत तहकूब करण्यात आले. त्यानंतर दिवसभरासाठी तहकूब केले गेले.
क्रीडा विधेयके प्रलंबित
लोकसभेमध्ये राष्ट्रीय क्रीडा प्रशासन विधेयक व डोपिंगविरोधी दुरुस्ती विधेयक अशी दोन विधेयके चर्चेसाठी आणली जाणार होती. या विधेयकांवर दोन दिवस चर्चा करण्यास विरोधी पक्षांनी संमती दिली होती. पण, लोकसभेचे कामकाजच होऊ दिले जात नसल्याने ही विधेयके रेंगाळली आहेत. विरोधकांनी सभागृहातील गोंधळ थांबवला नाही तर केंद्र सरकारला या गोंधळामध्येच विधेयके मंजूर करून घेण्याशिवाय पर्याय उरणार नाही असे संसदीय कामकाजमंत्री किरेन रिजिजू यांनी स्पष्ट केले.
बिहारमध्ये मतदारांचा फेरआढावा घेण्याचे काम केंद्रीय निवडणूक आयोगाचे असून त्यामध्ये केंद्र सरकारचा हस्तक्षेप नाही. त्यामुळे या विषयावर संसदेच्या सभागृहांमध्ये केंद्र सरकारकडून कोणतीही भूमिका मांडली जाणार नाही. – किरेन रिजिजू, संसदीय कामकाजमंत्री