जगाला सत्याग्रह, अहिंसा आणि शांततेची शिकवण देणाऱ्या राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या जीवनावरील संकेतस्थळाचे गुरुवारी संध्याकाळी अनावरण करण्यात आले. ‘मुलांसाठी महात्मा गांधी’ हे उद्दिष्ट समोर ठेवून हे संकेतस्थळ बनवण्यात आले असून, ते मुलांसाठी प्रेरणादायी असेल, असा विश्वास या संकेतस्थळाचे निर्माते सॅम पित्रोदा यांनी व्यक्त केला.महात्मा गांधी यांच्या ६६व्या पुण्यतिथीनिमित्त या संकेतस्थळाचे अनावरण करण्यात आले. पंतप्रधानांचे सल्लागार आणि राष्ट्रीय अभिनव आयोगाचे अध्यक्ष सॅम पित्रोदा यांनी ट्विटरवरून याची माहिती दिली. हिंदी आणि इंग्रजी या दोन्ही भाषांमध्ये हे संकेतस्थळ उपलब्ध असून, ६ ते १५ वयोगटांतील मुलांसाठी या संकेतस्थळावरील माहिती अधिक उपयुक्त ठरेल, असे पित्रोदा यांनी सांगितले.
या संकेतस्थळावर ऑडिओ आणि व्हिडीओ यांच्याद्वारेही गांधीजींबाबत माहिती देण्यात आली आहे. त्याशिवाय गेम, क्विझ असेही प्रकार या संकेतस्थळावर उपलब्ध आहेत.