Mamata Banerjee On PM Modi Maldives Visit : भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी हे नुकतेच विदेश दौऱ्यावरून परतले आहेत. पंतप्रधान मोदी यांनी ब्रिटन आणि मालदीवचा दौरा केला. या दौऱ्यावेळी मोदींनी ब्रिटनचे पंतप्रधान कीर स्टार्मर यांची भेट घेतली, तसेच भारत आणि ब्रिटनमध्ये ऐतिहासिक मुक्त व्यापार करारही यावेळी झाला. त्यानंतर पंतप्रधान मोदी हे मालदीवच्या दौऱ्यावर गेले होते. मालदीवमध्ये मोदींचं जंगी स्वागत करण्यात आल्याचं पाहायला मिळालं.
यावेळी पंतप्रधान मोदी आणि मालदीवचे अध्यक्ष मोहम्मद मुइज्जू यांच्यात संयुक्त बैठकही पार पडली. यावेळी मोदींनी मालदीवला तब्बल ५६५ दशलक्ष डॉलर्स लाइन ऑफ क्रेडिट देण्याची घोषणा केली. मालदीवला देण्यात येणाऱ्या ५६५ दशलक्ष डॉलर्सच्या कर्जावरून आता पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर जोरदार टीका केली.या संदर्भातील वृत्त हिंदुस्तान टाईम्सने दिलं आहे.
तसेच केंद्र सरकारने पश्चिम बंगालला निधीपासून वंचित ठेवल्याचा आरोपही ममता बॅनर्जी यांनी सोमवारी केंद्र सरकारवर केला. तसेच सध्या देशात सुरू असलेल्या हिंदी सक्तीच्या मुद्यांवरूनही ममता बॅनर्जी यांनी घणाघात केला. बीरभूम जिल्ह्यातील बोलपूरहून बोलताना ममता बॅनर्जी यांनी म्हटलं की, “मी स्वतःचा जीव देईन, पण कोणालाही माझी भाषा हिसकावू देणार नाही.”
ममता बॅनर्जी यांची पंतप्रधान मोदींवर टीका
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मालदीव दौऱ्यावर टीका करताना ममता बॅनर्जी यांनी म्हटलं की, “तुम्ही मालदीवच्या अध्यक्षांना मिठी मारली आणि बंगालला त्यांच्या निधीपासून वंचित ठेवलं. मग मालदीवच्या अध्यक्षांना मिठी मारताना आणि ५६५ दशलक्ष डॉलर्स देताना तुम्ही धर्म विचारला होतात का?”, असा सवाल करत ममता बॅनर्जी यांनी पंतप्रधान मोदींवर टीका केली.
मालदीवला ५६५ दशलक्ष डॉलर्स देण्याची मोदींची घोषणा
दरम्यान, पंतप्रधान मोदी यांनी या दौऱ्याच्या दरम्यान मालदीवसाठी तब्बल ५६५ दशलक्ष डॉलर्स लाइन ऑफ क्रेडिट देण्याची घोषणा केली. तसेच पंतप्रधान मोदी यांनी भारत आणि मालदीवमध्ये मुक्त व्यापार करारावरही चर्चा केली. यावेळी मोदी म्हणाले होते की, “विकासाच्या भागीदारीच्या पार्श्वभूमीवर आम्ही मालदीवसाठी ५६५ दशलक्ष डॉलर्स देण्याचा निर्णय घेतला आहे. मालदीवच्या लोकांच्या प्राधान्यांनुसार येथील पायाभूत सुविधांच्या विकासाशी संबंधित प्रकल्पांसाठी ही मदत वापरली जाईल”, असं पंतप्रधान मोदी यांनी म्हटलं होतं.
पंतप्रधान मोदींचं मालदीवमध्ये भव्य स्वागत झालं होतं
पंतप्रधान मोदी यांनी मालदीवचे अध्यक्ष मोहम्मद मुइज्जू यांच्याशी विविध विषयांवर चर्चा केली. तसेच व्यापार, संरक्षण आणि पायाभूत सुविधांच्या क्षेत्रात सहकार्य मजबूत करण्यावर भर दिला. दरम्यान, आज (२५ जुलै) सकाळी पंतप्रधान मोदी मालदीवमध्ये पोहोचले, तेव्हा त्यांचं जोरदार स्वागत करण्यात आलं. त्यांच्या स्वागतासाठी मालदीवचे अध्यक्ष मोहम्मद मुइज्जू हे देखील उपस्थित होते.