मागण्यांबाबत खुल्या ठिकाणी बैठक घेण्याची मागणी

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

उपचारादरम्यान रुग्णाचा मृत्यू झाल्यानंतर दोन ट्रक भरून आलेल्या व्यक्तींनी डॉक्टरला प्राणघातक मारहाण केल्याच्या प्रकरणानंतर पश्चिम बंगालमध्ये संपावर असलेल्या डॉक्टरांनी नरमाईची भूमिका घेतली आहे. मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्याशी आम्ही त्या ठरवतील तेथे चर्चा करण्यास तयार आहोत, पण ही बैठक खुल्या जागेत व्हावी, असे डॉक्टरांच्या संघटनेने म्हटले आहे. बॅनर्जी यांनी शनिवारी डॉक्टरांना सचिवालयात बंद खोलीत चर्चेसाठी बोलावले होते पण तो प्रस्ताव डॉक्टर संघटनेने फेटाळला होता.

डॉक्टर संघटनेच्या बैठकीनंतर त्यांच्या प्रवक्तयाने सांगितले, की हा तिढा सोडवण्यासाठी मुख्यमंत्र्यांशी चर्चा करण्यास आमची तयारी आहे, त्या ठरवतील तेथे चर्चा करण्यास तयार आहोत पण चर्चा बंद खोलीत होता कामा नये. बैठकीची जागा प्रशस्त असावी जेणेकरून सर्व प्रतिनिधींना त्यात सहभागी होता येईल. याआधी संघटनेने असे म्हटले होते, की मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी डॉक्टरला मारहाणीची घटना जेथे घडली, त्या एनआरएस मेडिकल कॉलेज येथे चर्चेला यावे. सामान्य लोकांच्या हितासाठी आम्ही कामावर येण्यास तयार आहोत पण आमच्या सर्व मागण्या मान्य केल्या पाहिजेत. मुख्यमंत्री आमच्या मागण्या मान्य करतील अशी अपेक्षा आहे. सोमवारी रात्री उपचारादरम्यान एका रुग्णाचा मृत्यू झाल्यानंतर दोन डॉक्टरांवर प्राणघातक हल्ला करण्यात आला होता. गेले सहा दिवस वैद्यकीय सेवा विस्कळीत असून आपत्कालीन, बाह्य़ रुग्ण विभाग बंद आहेत.

आयएमएचा १७ जूनला संप : पश्चिम बंगालमधील डॉक्टरांच्या संपाचा तिढा सुटण्याची शक्यता असली, तरी दी इंडियन मेडिकल असोसिएशन या संघटनेने १७ जूनला देशव्यापी संपाची घोषणा केली आहे. त्यात अत्यावश्यक सेवा वगळण्यात येणार असून बाह्य़ रुग्ण विभाग बंद ठेवण्यात येणार आहेत. आरोग्यमंत्री हर्षवर्धन यांनी डॉक्टर व वैद्यक व्यावसायिकांच्या संरक्षणासाठी राज्यांनी कायदा करावा, असे सांगून जबाबदारी झटकण्याचा प्रयत्न केला असला, तरी आयएमएने याबाबत केंद्राने कायदा करावा, अशी मागणी केली आहे. डॉक्टर, आरोग्य कर्मचारी व रुग्णालयांविरोधातील हिंसाचार थांबवण्यासाठी केंद्रीय कायदा गरजेचा आहे, त्यासाठी भादंवि व गुन्हेगारी दंडसंहितेत कडक शिक्षेची तरतूद करावी, अशी मागणी करण्यात आली आहे.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: West bengal doctors strike
First published on: 17-06-2019 at 00:13 IST