पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीत भाजपाला रोखत ममता बॅनर्जी यांच्या नेतृत्वाखाली तृणमूल काँग्रेसने दणदणीत विजय मिळवला. तृणमूल काँग्रेसने २१३ जागा जिंकल्या असून, ममता बॅनर्जी तिसऱ्यांदा बंगालच्या मुख्यमंत्रीपदी विराजमान होत आहे. ममतांच्या मुख्यमंत्री होण्याला भाजपाने विरोध केला आहे. भाजपाचे त्रिपुराचे मुख्यमंत्री विप्लव देव यांनी ममतांना मुख्यमंत्री होण्याचा नैतिक अधिकार नसल्याचं सांगत विरोध दर्शविला आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

पश्चिम बंगाल विधानसभेच्या २९४ जागांसाठी नुकतीच निवडणूक पार पडली. रविवारी (२ मे) निवडणुकीचे निकाल जाहीर झाले. निकालाने पश्चिम बंगालमध्ये ममता बॅनर्जी यांचं वर्चस्व कायम असल्याचं सिद्ध झालं. ममतांच्या तृणमूल काँग्रेसनं २१३ जागा जिंकल्या असून, सलग तिसऱ्यांदा मुख्यमंत्री होत आहेत. ममतांच्या मुख्यमंत्री होण्याला भाजपाचे त्रिपुराचे मुख्यमंत्री विप्लव कुमार देव यांनी विरोध केला आहे.

आगरातळा येथील भाजपाच्या मुख्यालयात झालेल्या पत्रकार परिषदेत बोलताना देव यांनी ममतांच्या मुख्यमंत्री होण्याला विरोध दर्शविला आहे. त्याचबरोबर निकालानंतर घडलेल्या हिंसाचारावरून ममतांवर आरोप केले आहेत. “काही राज्यात झालेल्या विधानसभा निवडणुकीत भाजपाचा पराभव झाला आहे. पण, भाजपाच्या मतांच्या टक्केवारीमध्ये अनेक पटींनी वाढ झाली आहे,” असं मुख्यमंत्री देव म्हणाले.

“निवडणूक न लढवता अनेकजण मुख्यमंत्री बनले आहेत, पण ममता बॅनर्जी यांनी नंदीग्राममधून निवडणूक लढवली आणि त्या पराभूत झाल्या. लोकांनी त्यांना निवडून दिलेलं नाही. त्यामुळे नैतिकतेच्या आधारावर ममतांनी स्वतःला मुख्यमंत्री पदापासून स्वतःला दूर ठेवावं. त्यांच्याविरुद्ध कटकारस्थान रचल्याचा दावा आता ममता बॅनर्जी करत आहेत. त्यांचा पराभव हा कट होता, तर निवडणुकीतील विजयामागेही कटकारस्थान आहे का?,” असा सवाल त्यांनी उपस्थित केला.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: West bengal election result mamata should not become west bengal chief minister ethically biplab kumar deb bmh
First published on: 05-05-2021 at 08:00 IST