Thalapathy Vijay Karur Stampede : अभिनेता थलपती विजयची तामिळनाडूच्या करूरमध्ये शनिवारी रॅली आयोजित करण्यात आली होती. या रॅलीमध्ये हजारो नागरिक सहभागी झाले होते. पण या रॅली दरम्यान चेंगराचेंगरीची घटना घडली, या घटनेत ३८ जणांचा मृत्यू झाला, तसेच मृतांचा आकडा आणखी वाढण्याची भीती व्यक्त केली जात आहे. या घटनेतील मृतांच्या नातेवाईकांना प्रत्येकी १० लाखांची मदत जाहीर करण्यात आली आहे.
या संपूर्ण घटनेची चौकशी करण्याचे आदेश तामिळनाडू सरकारने दिले आहेत. मात्र, चेंगराचेंगरीची घटना नेमकं कशामुळे घडली? याची धक्कादायक कारणं तामिळनाडूचे प्रभारी डीजीपी जी. वेंकटरमण यांनी सांगितली आहेत. ‘थलपती विजय रॅलीच्या ठिकाणी तब्बल ७ तास उशीरा पोहोचला, त्यामुळे अचानक समर्थकांची गर्दी वाढली, या रॅलीसाठी लोक सकाळी ७ वाजल्यापासून उभा होते. मात्र, त्या लोकांना पुरेसं पाणी आणि अन्न देखील मिळालं नाही’, असं प्रभारी डीजीपींनी म्हटलं आहे. या संदर्भातील वृत्त एनडीटीव्हीने दिलं आहे.
डीजीपींनी काय सांगितलं?
“विजयला या रॅलीला पोहोचण्यास तब्बल सात तास उशीर झाला आणि त्यामुळे लोकांची गर्दी मोठ्या प्रमाणात वाढली. तसेच आयोजकांनी अपेक्षित लोकांची संख्या १०,००० असल्याचं सांगितलं होतं. मात्र, २७,००० लोकांनी या रॅलीत सहभाग घेतला. त्यामुळे गर्दी मोठ्या प्रमाणात वाढली. या रॅलीसाठी ५०० पोलीस कर्मचारी तैनात करण्यात आले होते. थलपती विजयच्या आधीच्या रॅलींमध्ये गर्दी कमी होती. पण यावेळी अपेक्षेपेक्षा खूपच जास्त गर्दी होती”, असं वरिष्ठ पोलीस अधिकारी जी वेंकटरमण यांनी म्हटलं आहे.
“टीव्हीके पक्षाने त्यांच्या अधिकृत एक्स (ट्विटर) हँडलवर अभिनेता थलपती विजय दुपारी १२ वाजेपर्यंत रॅलीच्या ठिकाणी पोहोचतील अशी घोषणा केल्यानंतर गर्दी वाढली. मात्र, रॅलीसाठी परवानगी दुपारी ३ ते रात्री १० दरम्यान मागितली गेली होती. या रॅलीसाठी सकाळी ११ वाजल्यापासून गर्दी जमा झाली होती. मात्र, या रॅलीच्या ठिकाणी थलपती विजय सायंकाळी ७.४० वाजता दाखल झाला. कडक उन्हात लोकांकडे पुरेसं अन्न आणि पाणी नव्हतं. आता चेंगराचेंगरी नेमकी कशामुळे झाली? याचं नेमकं कारण आता सांगणं कठीण असून पोलीस चौकशी करत आहेत”, असं वेंकटरमण यांनी म्हटलं आहे.
#WATCH | Karur, Tamil Nadu | On the Karur stampede, Additional Director General of Police (ADGP), Law and Order, S. Davidson Devasirvatham says, "…We will have to get the preliminary investigation done. Thirty-nine people have lost their lives. A case has been registered…" pic.twitter.com/6YKeWwCmUR
— ANI (@ANI) September 28, 2025
नेमकं काय घडलं?
थलपती विजयने अभिनय क्षेत्र गाजवल्यानंतर आता राजकारणात प्रवेश केला आहे. तामिळनाडूच्या आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर थलपती विजयने मोठी तयारी सुरू केली असून त्या अनुषंगाने तामिळनाडूच्या विविध शहरांत रॅली काढण्यात येत आहे. दरम्यान, शनिवारी संध्याकाळी करूर या ठिकाणी रॅली काढण्यात आली होती. मात्र, याच रॅलीत चेंगराचेंगरीची घटना घटली. यामध्ये किमान ३८ जणांचा मृत्यू झाला असून १०० पेक्षा जास्त नागरिक जखमी झाले आहेत. सर्व जखमींवर रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
विजयने तमिझगा वेत्री कळगम या पक्षाची स्थापना केलेली आहे. तामिळनाडूत होणाऱ्या आगामी निवडणुकीसाठी जोरदार तयारी सुरू केली आहे. याचाच भाग म्हणून एक सभा आयोजित करण्यात आली होती. या सभेसाठी हजारो लोकांनी गर्दी केली होती. याच दरम्यान गर्दी अनियंत्रित झाल्याने चेंगराचेंगरी झाली. परिस्थिती हाताबाहेर गेल्याने विजयने आपलं भाषण मध्येच थांबवलं.