scorecardresearch

भगवान श्रीरामाशी तुमचे काय वैर आहे?; हार्दिक पटेल यांचा काँग्रेसला सवाल

काँग्रेस पक्ष लोकांच्या भावना दुखावतो आणि हिंदू धर्माच्या श्रद्धेला धक्का पोहोचवण्याचा प्रयत्न करतो, असे हार्दिक पटेल यांनी म्हटले आहे

Hardik Patel

नुकतेच काँग्रेस पक्ष सोडलेल्या पाटीदार समाजाचे नेते हार्दिक पटेल यांनी मंगळवारी काँग्रेसवर गंभीर आरोप केले. काँग्रेस पक्ष लोकांच्या भावना दुखावतो आणि हिंदू धर्माच्या श्रद्धेला धक्का पोहोचवण्याचा प्रयत्न करतो, असे हार्दिक पटेल यांनी म्हटले आहे. गुजरात काँग्रेसच्या एका नेत्याच्या वक्तव्यावरही त्यांनी प्रश्न उपस्थित केला आहे.

“मी यापूर्वीही म्हटले होते की, काँग्रेस पक्ष जनतेच्या भावना दुखावण्याचे काम करतो, हिंदू धर्माच्या श्रद्धेला तडा देण्याचा प्रयत्न करतो. आज माजी केंद्रीय मंत्री आणि गुजरात काँग्रेसच्या नेत्याने राम मंदिराच्या विटांवर कुत्रे लघवी करतात असे विधान केले! मला काँग्रेस आणि त्यांच्या नेत्यांना विचारायचे आहे की, भगवान श्रीरामाशी तुमचे काय वैर आहे? तुम्ही हिंदूंचा इतका द्वेष का करता? शतकांनंतर अयोध्येत भगवान श्रीरामाचे मंदिर बांधले जात आहे, तरीही काँग्रेसचे नेते प्रभू श्रीरामाच्या विरोधात वक्तव्ये करत आहेत,” असे हार्दिक पटेल यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटले आहे.

हार्दिक पटेल यांनी १८ मे रोजी काँग्रेस पक्षाच्या पदाचा आणि प्राथमिक सदस्यत्वाचा राजीनामा दिला होता. हार्दिक पटेल काँग्रेसमधून बाहेर पडणार असल्याचे संकेत गेल्या काही महिन्यांपासून मिळत होते. प्रदेश काँग्रेस नेत्यांवर जाहीर नाराजी व्यक्त करताना हार्दीक यांनी पक्षाच्या वरिष्ठ नेतृत्वाबाबत ममत्व बाळगले होते. मात्र, त्यांनी काँग्रेसच्या हंगामी अध्यक्ष सोनिया गांधी यांना पाठवलेल्या राजीनामा पत्रात प्रदेश काँग्रेस नेत्यांबरोबरच शीर्ष नेतृत्वालाही लक्ष्य केले.

“काँग्रेस पक्ष केवळ निषेधाच्या राजकारणापुरता मर्यादित राहिला आहे, तर देशातील जनतेला विरोध नाही तर त्यांच्या भविष्याचा विचार करणारा आणि देशाला पुढे नेण्याची क्षमता असलेला पर्याय हवा आहे. अयोध्येतील राम मंदिर असो, सीएए-एनआरसीचा मुद्दा असो, जम्मू-काश्मीरमधून कलम ३७० हटवणे असो किंवा जीएसटी लागू करणे असो, देशाला दीर्घकाळापासून यावर तोडगा हवा होता. मात्र, काँग्रेसने यात केवळ अडथळा म्हणून काम केले. काँग्रेसची भूमिका केवळ केंद्राला विरोध करण्यापुरती मर्यादित होती,” असे हार्दिक पटले यांनी आपला राजीनामा देताना म्हटले होते.

मराठीतील सर्व देश-विदेश ( Desh-videsh ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: What is your enmity with lord rama hardik patel question to congress abn

ताज्या बातम्या