Prashant Kishor on Bihar Assembly Election 2025 : बिहार विधानसभा निवडणुकीचा बिगुल वाजला आहे. त्यामुळे आता सर्वच राजकीय पक्षांनी जोरदार तयारी सुरू केली असून प्रचाराला वेग आला आहे. भाजपाप्रणीत राष्ट्रीय लोकशाही आघाडी, काँग्रेसप्रणीत महाआघाडीसह काही स्थानिक पक्ष निवडणुकीच्या मैदानात आहेत. दरम्यान, बिहारच्या निवडणुकीत प्रशांत किशोर यांचा जन सुराज पक्ष निवडणुकीच्या रिंगणात उतरल्याने तिरंगी लढत होणार आहे. त्यामुळे या निवडणुकीकडे अवघ्या देशाचं लक्ष लागलं आहे. या पार्श्वभूमीवरच प्रशांत किशोर यांनी ‘टाईम्स नाऊ’ला दिलेल्या मुलाखतीत विविध विषयांवर भाष्य केलं आहे. तसेच जर बिहारमध्ये जन सुराज पक्षाचं सरकार आलं तर एका महिन्यांत सात मोठे निर्णय घेणार असल्याचं प्रशांत किशोर यांनी म्हटलं आहे. ते सात निर्णय कोणते जाणून घेऊयात.
जनसुराज्य पक्षाचं सरकार आल्यास कोणते ७ निर्णय घेणार?
बिहारमध्ये जनसुराज्य पक्षाचं सरकार आल्यास दारू बंदी उठवू, असं तुम्ही म्हटलं, यावर तुमची नेमकी भूमिका काय आहे? असा प्रश्न विचारला असता प्रशांत किशोर म्हणाले की, “आम्ही म्हटलं की जनसुराज्य पक्षाचं सरकार आल्यास बाकीचे सर्व कामे तर होतीलच. पण एका महिन्यांत आम्ही सात मोठे निर्णय घेऊ. त्यामध्ये सर्वात पहिलं म्हणजे बिहारमधील दारू बंदी कायदा हटवण्याचा निर्णय घेऊ. आताचं सरकार दारू बंदी करून जनतेच्या २० हजार कोटींचं नुकसान करत आहे.”
“दुसरा निर्णय म्हणजे बिहारमधील ६० वर्षांच्या वरील सर्व व्यक्तींना, दिव्यांगांना आणि विधवा महिलांना २००० हजार रुपये महिन्याला देणार, त्यानंतर पहिल्या ७ दिवसांत एक वेगळा विभाग स्थापन करणार आणि जे बिहारमधून रोजगारासाठी बाहेर गेले आहेत, त्या सर्वांना एका वर्षांत बिहारमध्येच रोजगार मिळेल, यासाठी उपाययोजना केल्या जातील”, असं प्रशांत किशोर यांनी म्हटलं.
“तसेच ज्या गावातील सरकारी शाळांची अवस्था खराब आहे, त्या गावातील मुलांना पालकांनी खासगी शाळेत पाठवल्यास त्यांची संपूर्ण फी सरकार देणार, त्याचबरोबर शेतकऱ्यांना मनरेगाच्या माध्यमातून मजदूर मुक्त केलं जाईल. तसेच जे लोकं बिहारमध्ये रोजगार करू इच्छित आहेत त्या सर्वांना आम्ही कर्ज देऊ आणि त्या कर्जावर फक्त ४ टक्के व्याज घेऊ, कमी व्याजदरात कर्ज देण्याचा हेतू म्हणजे तरुण-तरुणी त्यांचा स्वत:चा व्यवसाय उभा करू शकतील. तसेच जे भ्रष्ट लोक आहेत, मग त्यामध्ये नेते किंवा सरकारी अधिकारी असतील, त्यांच्यासाठी आमचं सरकार आल्यानंतर एक विशेष कायदा बनवला जाईल आणि त्यांनी लुटलेला सर्व पैसा जप्त केला जाईल”, असं प्रशांत किशोर यांनी म्हटलं आहे.
‘…तर एका महिन्यात राजीनामा देऊ’
“आम्ही आश्वासन दिलेल्या ७ निर्णयांपैकी एका महिन्यांत हे सात निर्णय आम्ही घेतले नाही तर एका महिन्याच्या आत जनसुराज्य पक्षाचं सरकार राजीनामा देईल”, असं मोठं विधान प्रशांत किशोर यांनी केलं आहे.