ऑपरेशन ब्लू स्टार चुकीच्या पद्धतीने राबवण्यात आलं. इंदिरा गांधी यांना जीव गमावून त्या निर्णयाची किंमत मोजावी लागली असं वक्तव्य माजी केंद्रीय गृहमंत्री पी. चिदंबरम यांनी केलं. हिमाचल प्रदेशातील कसौली या ठिकाणी झालेल्या एका साहित्य संमेलनाच्या कार्यक्रमात झालेल्या मुलाखतीत हे वक्तव्य चिदंबरम यांनी केलं. आपण जाणून घेऊ त्यांच्या वक्तव्यामुळे चर्चेत आलेलं ऑपरेशन ब्लू स्टार काय होतं?

१९८४ मध्ये राबवण्यात आलं ऑपरेशन ब्लू स्टार

ऑपरेशन ब्लू स्टार १९८४ मध्ये पंजाब मध्ये राबवण्यात आलं. शिखांसाठी सर्वात पवित्र असं धर्मस्थळ असलेल्या अमृतसरच्या सुवर्ण मंदिरात त्यावेळी सैन्य गेलं होतं. ज्यामुळे शिख धर्मीयांच्या भावना दुखावल्या. १९८० च्या दशकात पंजाबमध्ये फुटिरतावादी चळवळीनं वेग घेतला. खलिस्तान म्हणजेच वेगळ्या पंजाबच्या मागणीसाठी जर्नेलसिंग भिंद्रनवाले यांच्या नेतृत्वात आंदोलन पुकारण्यात आलं. त्याकाळात पंजाबला भारतापासून वेगळं करून एक वेगळा प्रदेश करण्यासाठी भाषणं दिली जाऊ लागली. भारताबरोबर सशस्त्र संघर्ष करायला तयार रहा, असंसुद्धा सांगितलं जाऊ लागलं होतं. त्यामुळे तणाव वाढला होता. देशाच्या पंतप्रधानपदी तेव्हा इंदिरा गांधी होत्या. ३१ मे १९८४ ला अमृतसरच्या सुवर्ण मंदिराचा ताबा भिंद्रनवाले यांनी घेतला. पंजाबमध्ये कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला त्यामुळेच हे ऑपरेशन राबवण्याचा निर्णय घेण्यात आला. बीबीसीने हे वृत्त दिलं आहे.

सुवर्ण मंदिराच्या पायऱ्यांवर झालेली ती हत्या

एप्रिल १९८३ च्या दरम्यान हिंसक कारवाया खूप वाढल्या. पंजाब पोलीस दलात कार्यरत असलेले उपमहानिरीक्षक अवतार सिंग अटवाल यांची सुवर्ण मंदिराच्या पायऱ्यांवर भरदिवसा हत्या करण्यात आली. अटवाल या ठिकाणी माथा टेकवण्यासाठी म्हणजेच दर्शनासाठी गेले होते. त्यावेळी मारेकरी मंदिराच्या आतून आले आणि त्यांनी अवतार सिंग अटवाल यांच्यावर गोळ्या झाडल्या आणि ते सुवर्ण मंदिरात गेले. यानंतर फेब्रुवारी १९८४ मध्ये ऑपरेशन ब्लू स्टार राबवण्याची चर्चा शेवटच्या टप्प्यात आली होती. दरम्यान इंदिरा गांधींनी पंजाबचं सरकार बरखास्त करुन तिथे राष्ट्रपती राजवटही लावली होती. १ जून १९८४ ला इंदिरा गांधी यांनी पंजाबचं प्रशासन लष्कराच्या ताब्यात दिलं.

Operation Blue Star News
पी. चिदंबरम यांच्या वक्तव्यामुळे ऑपरेशन ब्लू स्टार पुन्हा चर्चेत आलं आहे. (सर्व फोटो इंडियन एक्स्प्रेस)

२ जून ते ७ जून १९८४ या कालावधीत काय घडलं?

२ जून १९८४ ला इंदिरा गांधींनी देशाला दूरदर्शनवरुन संबोधन केलं. त्यानंतर त्यांनी जर्नलसिंग भिंद्रनवाले यांना चर्चेचं आमंत्रण दिलं. दुसरीकडे मेजर जनरल कुलदीपसिंग ब्रार यांच्या नेतृ्तवात भारतीय लष्कराच्या नवव्या तुकडीने सुवर्ण मंदिराच्या दिशेने मोर्चा वळवला होता. त्यानंतर ३ जूनच्या दुपारी भिंद्रनवालेंनी पत्रकार परिषद बोलवली. तोपर्यंत लष्कर सुवर्ण मंदिराच्या दारात पोहचलं होतं. मंदिरात त्यावेळी भाविकांची गर्दी झाली होती कारण २ जून १९८४ ला शिखांसाठीचं गुरू अर्जन पर्व सुरु झालं होतं. भिंद्रनवालेंची पत्रकार परिषदही शेवटची ठरली कारण लष्कराने त्यानंतर कारवाई सुरु केली. लष्कराने आतमध्ये असलेल्या भाविकांना बाहेर पडण्याचं आवाहन लाऊड स्पीकरद्वारे केलं. ४ जूनला लष्कराने गोळीबार सुरु केला. मात्र त्यांना प्रत्युत्तर मिळालं. ज्यानंतर लष्कराने रणगाडे मंदिरात घुसवले आणि लष्कर हरमंदिर साहिब या गाभाऱ्यापर्यंत पोहचलं. ७ जूनच्या रात्री भिंद्रनवालेंचा मृतदेह सापडला ज्यानंतर ऑपरेशन ब्लू स्टार संपुष्टात आलं.

Operation Blue Star
ऑपरेशन ब्लू स्टार राबवल्यानंतर इंदिरा गांधींच्या सरकारविरोधात शीख समुदायाचा रोष उसळला होता.

३१ ऑक्टोबर १९८४ ला इंदिरा गांधींची हत्या

ऑपरेशन ब्लू स्टार संपुष्टात आल्यानंतर इंदिरा सरकार आणि लष्कराविरोधातही रोष उसळला. लष्कराने शिखांवर अत्याचार केल्याच्या अनेक अफवा उठल्या, देशाच्या अनेक कानाकोपऱ्यांत हिंसक घटना झाल्या. केवळ चार महिन्यांतच पंतप्रधान इंदिरा गांधींची दिल्लीतल्या राहत्या निवासस्थानी त्यांच्याच अंगरक्षकांनी हत्या केली. शिख समाजाच्या धार्मिक भावना प्रचंड दुखावल्या गेल्या. तसंच सुवर्ण मंदिराचीही हानी झाली होती. ज्यामुळे इंदिरा गांधी यांच्यावर त्यांच्याच शिख अंगरक्षकांनी गोळ्या झाडल्या. ३१ ऑक्टोबरला १९८४ ला इंदिरा गांधींची हत्या करण्यात आली.