गेल्या तीन वर्षांमध्ये करोनानं जगभरात घातलेलं थैमान आपण सर्वांनीच पाहिलं. लाखो लोकांचा मृत्यू झाला, तर अजूनही लाखो लोक उपचार घेत आहेत. आत्ता कुठे करोनाचं संकट ओसरलं असतानाच करोनाहून भयंकर आजारासाठी जगानं तयार राहण्याचा इशारा जागतिक आरोग्य संघटना अर्थात WHO चे प्रमुख डॉ. टेड्रॉस अधानोम गेब्रियेसस यांनी दिला आहे. जिनिव्हामध्ये आयोजित करण्यात आलेल्या हेल्थ असेम्ब्लीसमोर ते बोलत होते. यावेळी त्यांनी करोनाचाही नवा व्हेरिएंट येण्याची भीती व्यक्त केली. इंडिया टुडेनं यासंदर्भातलं सविस्तर वृत्त दिलं आहे.

करोनामुळे आत्तापर्यंत २ कोटी मृत्यू?

जगभरात करोनामुळे मृत्यू झालेल्यांची अधित आकडेवारी ७० लाख असल्याचं सांगितलं जातं. मात्र, डॉ. टेड्रॉस यांनी हा आकडा प्रत्यक्षात अनेक पटींनी जास्त असल्याचं म्हटलं आहे. “गेल्या तीन वर्षांत करोनानं जगामध्ये उलथापालथ घडवून आणली. किमान ७० लाख लोकांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली. पण आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे की याचा खरा आकडा याहून कित्येक पटींनी जास्त आहे. किमान २ कोटी इतका हा आकडा आहे”, असं टेड्रॉस म्हणाले.

“आता वेळ आली आहे की…”

दरम्यान, डॉ. टेड्रॉस यांनी जगानं नव्या आजारासाठी तयार होण्याचं आवाहन केलं आहे. “आता जगानं पुढच्या महासाथीसाठी तयार राहायला हवं. करोनाचाही नवीन व अधिक धोकादायक व्हेरिएंट येऊन त्यातून आजार आणि मृत्यू वाढण्याची भीती कायम आहे. अशाच प्रकारची आणखीन एक, किंबहुना अधिक जीवघेणी महासाथ येण्याची शक्यताही आपण नाकारू शकत नाही. यानंतर पुन्हा जागतिक आजार येणार असून त्यासाठी जगानं तयार राहायला हवं”, असं टेड्रॉस या परिषदेत म्हणाले.

विश्लेषण: कर्नाटकच्या निकालानंतर भाजपविरोधात एकजुटीची चर्चा, नितीशकुमारांच्या प्रयत्नांना यश येईल? 

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

दरम्यान, करोनासंदर्भात बोलताना डॉ. टेड्रॉस म्हणाले, “जर आपण या सर्व परिस्थितीत बदल केले नाहीत, तर कोण करेल? जर आपण आत्ता हे बदल केले नाहीत, तर मग कधी करणार? जेव्हा पुढची महासाथ येईल, तेव्हा आपण तिचा सामना सक्षमपणे करण्यासाठी, एकत्रितपणे करण्यासाठी तयार राहायला हवं”, असंही टेड्रॉस यांनी या परिषदेत नमूद केलं.