अध्यात्मिक गुरु बागेश्वर बाबा हे त्यांच्या विविध वक्तव्यांमुळे चर्चेत असतात किंवा त्यांच्या वक्तव्यांमुळे वादही होत असतात. बागेश्वर धाम सरकार असंही ते स्वतःला म्हणवतात. अशात आता त्यांचं आणखी एक वक्तव्य चर्चेत आलं आहे. गुजरातमधल्या वडोदरा या ठिकाणी झालेल्या दिव्य दरबार प्रवचन कार्यक्रमानंतर पत्रकारांशी संवाद साधत असताना त्यांनी हे वक्तव्य केलं आहे. वडोदरातल्या नवलाखी मैदानावर हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. काय म्हटलं आहे बागेश्वर बाबांनी "दहा रुपयांच्या राजकारणासाठी कोट्यवधींचं अध्यात्म कोण सोडणार? " असं वक्तव्य धीरेंद्र शास्त्रींनी केलं आहे. धीरेंद्र शास्त्री यांचं प्रवचन झाल्यानंतर मीडियाशी त्यांचा संवाद आयोजित करण्यात आला होता. या प्रश्नाला उत्तर देताना बागेश्वर बाबांनी हे उत्तर दिलं आहे. यावेळी त्यांच्यासह भाजपाचे नेते विजय शाहही उपस्थित होते. गुजरातचे लोक पागल असतात.. या वक्तव्यावरही स्पष्टीकरण याच वेळी धीरेंद्र शास्त्रींनी गुजरातचे लोक पागल असतात या वक्तव्यावरुन झालेल्या वादाविषयीही आपलं स्पष्टीकरण दिलं आहे. मी पागल हा शब्द त्यांच्या मनात असलेल्या तीव्र भावनांना अनुसरुन वापरला होता. गुजरातचे लोक धर्मासाठी पागल आहेत असं मी म्हटलं होतं कारण गुजरातचे लोक हे धर्मावर मनापासून प्रेम करतात. माझ्या शब्दाचा चुकीचा अर्थ लावला गेला असंही बागेश्वर बाबांनी म्हटलं आहे. तसंच ज्यांना मी हे बोललो ते समजून घ्यायचं नव्हतं त्या लोकांनी उगाचच माझ्या बोलण्याचा चुकीचा अर्थ काढला असंही त्यांनी म्हटलं आहे. ओडिशा अपघाताविषयी काय म्हणाले धीरेंद्र शास्त्री? ओडिशा अपघाताविषयी जेव्हा धीरेंद्र शास्त्रींना प्रश्न विचारण्यात आला तेव्हा ते म्हणाले की ही घटना अत्यंत वेदनादायी आहे. या घटनेने माझं मन व्यथित झालं आहे. या अपघातात जे लोक जखमी झाले आहेत त्यांना लवकर आराम पडावा म्हणून मी प्रार्थना करतो आहे. अशा मोठ्या घटना घडतात तेव्हा तुम्हाला त्याचे संकेत मिळतात का? असा प्रश्न विचारल्यावर बागेश्वर बाबांनी हो असं उत्तर दिलं आहे. तसंच ते पुढे म्हणाले की, "एखादी घटना होणार आहे याचे संकेत मिळणं ही वेगळी गोष्ट आहे आणि ती घटना टाळता येणं ही वेगळी गोष्ट आहे. भगवान कृष्णाला हे माहित होतं की महाभारत होणार आहे. मात्र ते महाभारत होणं टाळू शकले नाहीत."