Air India Plane Crash Aparna Mahadik: अहमदाबाद विमानतळाहून लंडनला जाणाऱ्या एअर इंडियाच्या विमानाचा उड्डाणानंतर अवघ्या नऊ मिनिटांत अपघात झाला. या विमानात क्रू सदस्य म्हणून खासदार सुनील तटकरे यांच्या नातेवाईक अपर्णा महाडिकही होत्या, अशी माहिती समोर आली आहे. अपर्ण महाडिक या सुनील तटकरे यांच्या बहिणीच्या सून होत्या.
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे (अजित पवार) प्रदेशाध्यक्ष आणि रायगडचे खासदार सुनील तटकरे यांचा भाचा अमोल महाडिक यांच्या पत्नी अपर्णा महाडिक या एअर इंडियाच्या विमानात क्रू सदस्य म्हणून कार्यरत होत्या. त्यांचे पती अमोल हेदेखील स्वतः एअर इंडियामध्ये वैमानिक म्हणून काम करतात, अशी माहिती समोर आली आहे.
एअर इंडियाच्या अपघातग्रस्त विमानात २३२ प्रवासी, दोन वैमानिक आणि १० क्रू सदस्य प्रवास करत होते. यापैकी १६९ प्रवासी भारतीय नागरिक होते. तर ५३ ब्रिटिश, १ कॅनडा आणि ७ पोर्तुगालचे नागरिक होते. गुजरात पोलिसांनी दिलेल्या व्यक्त केलेल्या भीतीनुसार सर्व २४२ प्रवाशांचा या दुर्घटनेत मृत्यू झाला आहे. सरकारच्या वतीने अद्याप मृतांच्या आकड्याबाबत अधिकृत माहिती दिली गेलेली नाही.
कॅप्टन सुमीर सभरवाल हे अपघातग्रस्त विमानाचे वैमानिक होते. त्यांना ८ हजार २०० तासांच्या उड्डाणांचा अनुभव आहे. त्याशिवाय केबिन क्रूलादेखील ११०० तासांच्या उड्डाणांचा अनुभव आहे, असे एअर इंडियाच्या निवेदनात म्हटले गेले आहे.
एअर इंडियाचं निवेदन काय?
अहमदाबादहून दुपारी १.३८ वाजता निघालेल्या बोईंग ७८७-८ विमानात २४२ प्रवासी होते. अपघातात जखमी झालेल्या लोकांना जवळच्या रुग्णालयात नेण्यात आले. या घटनेबद्दल अधिक माहिती देण्यासाठी आम्ही 1800 5691 444 हा एक पॅसेंजर हॉटलाइन नंबर सुरू केला आहे. या घटनेची चौकशी करणाऱ्या अधिकाऱ्यांना एअर इंडिया पूर्ण सहकार्य करत आहे. एअर इंडिया त्यांच्या अधिकृत एक्स हँडलवर आणि वेबसाईटवर या घटनेशी संबंधित सर्व अपडेट्स व माहिती शेअर करेल.
माजी मुख्यमंत्री विजय रुपाणीही होते विमानात
गुजरातचे माजी मुख्यमंत्री विजय रुपाणीदेखील या विमानाने प्रवास करत होते. विमानातील प्रवाशांची यादी समोर आली, त्यात त्यांचे नाव आहे. तसेच रुपाणी यांचा बोर्डिंग पासही समाज माध्यमातून समोर आला.