Who is Harsh Sanghvi: गुजरातच्या विधानसभा निवडणुकीला दोन वर्ष बाकी आहेत. २०२७ साली विधानसभेच्या निवडणुका होणार असून त्याआधी सत्ताधारी भाजपाने सरकारमध्ये मोठे फेरबदल केले आहेत. गांधीनगरच्या महात्मा मंदिर येथे आज नव्या मंत्र्यांना शपथ दिली गेली. मंत्रिमंडळात सर्वात मोठा बदल म्हणजे दोन दिवसांपूर्वी ज्यांना राजीनामा देण्यास सांगितले होते, त्या हर्ष सिंघवींना उपमुख्यमंत्रीपदाची जबाबदारी देण्यात आली. मागच्या चार वर्षांपासून गुजरातमध्ये कुणाकडेही ही जबाबदारी देण्यात आलेली नव्हती. हर्ष सिंघवी हे गुजरातचे सहावे उपमुख्यमंत्री बनले आहेत.

हर्ष सिंघवी यांना अतिशय कमी वयात म्हणजे ४० व्या वर्षी या पदावर काम करण्याची संधी मिळाली आहे. त्यामुळे ते सर्वात तरूण उपमुख्यमंत्री ठरले आहेत. आज एकूण २५ मंत्र्यांनी मंत्रिपदाची शपथ घेतली. ज्यामध्ये १९ नव्या चेहऱ्यांना संधी देण्यात आली आहे. तर ६ मंत्र्यांना पुन्हा एकदा संधी दिली गेली आहे.

हर्ष सिंघवी यांच्याकडे आधीच्या मंत्रिमंडळात गृह खात्याचा पदभार होता. मंत्रिमंडळात ते आधीच द्वितीय क्रमाकांचे खाते सांभाळत होते. त्यामुळे आता त्यांच्याकडे कोणते खाते देण्यात येणार याची उत्सुकता लागली आहे.

२७ व्या वर्षी बनले आमदार

२०१२ साली अवघ्या २७ व्या वर्षी सूरत जिल्ह्यातील माजुरा विधानसभा मतदारसंघातून हर्ष सिंघवी आमदार बनले होते. २०२१ साली त्यांना पहिल्यांदा मंत्री म्हणून काम करण्याची संधी दिली गेली होती. त्यानंतर सरकारमध्ये त्यांची दिवसेंदिवस प्रगती होत गेली.

शिक्षण आठवी पास

गुजरातचे नवे उपमुख्यमंत्री हर्ष संघवी यांचे शिक्षण आठवीपर्यंत झाले आहे. शिक्षण कमी असले तरी त्यांच्यावर पक्षाने विश्वास टाकला आहे. हर्ष संघवी अतिशय कमी वयात राजकारणात सक्रिय झाले होते. १५ व्या वर्षी त्यांनी भाजपाच्या युवा मोर्चामध्ये काम करण्यास सुरुवात केली. यानंतर युवा मोर्चाचे तत्कालीन राष्ट्रीय अध्यक्ष अनुराग ठाकूर यांनी संघवी यांना कार्यकारिणीमध्ये राष्ट्रीय उपाध्यक्ष म्हणून काम करण्याची संधी दिली.

प्रसिद्ध हिरे व्यापारी

जैन समाजातून येणारे हर्ष संघवी राजकारणाआधी हिरे व्यापारी म्हणून प्रसिद्ध होते. संघवी यांचा गिरनार कॉर्पोरेशन नावाचा हिऱ्यांचा कारखाना आहे. गुजरातच्या व्यापारी वर्गात त्यांचा चांगला प्रभाव आहे. पाटीदार समाजाचे नेते मुख्यमंत्री भूपेंद्र पटेल असताना त्यांच्या मंत्रिमंडळात हर्ष संघवी यांना महत्त्वाची भूमिका देऊन व्यापारी समाजात सूचक संदेश दिल्याचे बोलले जात आहे.

संपत्ती किती?

नवभारत टाइम्सने दिलेल्या बातमीनुसार, हर्ष संघवी यांच्याकडे १२.३२ कोटींची संपत्ती आहे. ज्यामध्ये सोन्याची दागिने, एका टोयोटा फॉर्च्युनर गाडीचा समावेश आहे. त्यांच्या पत्नीची अनेक कंपन्यांत गुंतवणूक आहे. ज्याचे मूल्य १०.५१ कोटी असल्याचे सांगितले जाते.