IAS Officer Srushti Deshmukh: मध्यप्रदेशमधील हायप्रोफाइल आयएएस जोडपे सध्या वादाच्या भोवऱ्यात अडकले आहे. आयएएस अधिकारी सृष्टी देशमुख यांचे पती आयएएस अधिकारी डॉ. नागार्जून गौडा यांच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप होत आहेत. अवैध खाणकाम प्रकरणात गैरव्यवहार केला असल्याचा त्यांच्यावर आरोप ठेवण्यात येत आहे. २०१८ साली पहिल्याच प्रयत्नात यूपीएससी परीक्षेत यश मिळवणाऱ्या सृष्टी देशमुख यानिमित्ताने पुन्हा एकदा चर्चेत आल्या आहेत.
२०१९ च्या बॅचचे आयएएस अधिकारी असलेल्या नागार्जून गौडा यांनी मध्यप्रदेशच्या हरदा जिल्ह्याचे अतिरीक्त जिल्हाधिकारी असताना अवैध खाणकाम करणाऱ्या कंपनीवरील दंड ५१ कोटींवरून ४००० रुपयांवर आणला होता. दंडाची रक्कम अतिशय क्षुल्लक पातळीवर आणण्यासाठी त्यांनी १० कोटी रुपयांची लाच घेतली असल्याचा आरोप करण्यात येत आहे.
आरोप पतीवर मग पत्नी चर्चेत का?
भ्रष्टाचाराचे आरोप नागार्जून गौडा यांच्यावर झाले असले तरी सृष्टी देशमुख चर्चेत आल्या आहेत. सृष्टी देशमुख या सोशल मीडियावर आणि खासकरून इन्स्टाग्रामवर चांगल्याच प्रसिद्ध आहेत. इन्स्टाग्रामवर त्यांचे २३ लाख फॉलोअर्स आहेत. २०१८ साली त्यांनी यूपीएससीच्या परीक्षेत देशातून पाचवा क्रमांक मिळवला होता. तसेच महिलांमधूनही त्यांनी चांगले गुण मिळवले होते.
कोण आहेत सृष्टी देशमुख?
सृष्टी देशमुख यांचा जन्म २८ मार्च १९९५ रोजी मध्यप्रदेशच्या भोपाळ येथील एका मध्यमवर्गीय मराठी कुटुंबात झाला. त्यांनी आपल्या इन्स्टाग्रामच्या बायोमध्ये मराठी आणि भोपाळी असा उल्लेख केला आहे. केमिकल इंजिनिअरिंगची पदवी घेतल्यानंतर त्यांनी यूपीएससीची तयारी सुरू केली. त्यांनी यूपीएससीमध्ये मिळवलेले यश अनेक परीक्षार्थींसाठी प्रेरणादायी ठरले होते.
नागार्जून गौडा यांनी यूपीएससीमध्ये देशभरातून ४१८ वा क्रमांक पटकावला होता. तेही प्रशासकीय कार्यासाठी प्रसिद्ध आहेत. पती-पत्नी आयएएस असल्यामुळे या जोडीला चांगली प्रसिद्धी लाभत असते. भविष्यात यूपीएएसी देऊ इच्छिणाऱ्यांसाठी मार्गदर्शन मिळावे, या हेतूपोटी सृष्टी देशमुख यांनी पुस्तकही लिहिलेले आहे.