हिमाचलच्या मंडी या मतदारसंघातून भाजपाच्या खासदार म्हणून निवडून आलेल्या अभिनेत्री कंगना रणौत यांना चंदीगढ विमानतळावर एका अपमानजनक प्रसंगाला सामोरं जावं लागलं. कंगना विमानतळावर आल्या तेव्हा सीआयएसफच्या अधिकारी कुलविंदर कौर यांनी आपल्याला थोबाडीत ठेवून दिली असा आरोप कंगना रणौत यांनी केला. ज्यानंतर कुलविंदर कौर यांना ताब्यात घेण्यात आलं. कंगना रणौत चंदीगढ विमानतळावर पोहचल्या. त्यांना दिल्लीला जायचं होतं. त्यावेळी बोर्डिंगसाठी जात असताना ही घटना घडली. या घटनेची चांगलीच चर्चा होते आहे.

कंगना दिल्लीत पोहचल्या

या सगळ्या घटनेनंतर कंगना रणौत दिल्लीत पोहचल्या आहेत. त्यांनी वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत सीआयएसएफच्या महासंचलाक नीना सिंह यांना ही सगळी घटना सांगितली आहे. कंगना यांनी हा आरोप केलाय की चंदीगढ एअरपोर्टच्या कर्टन एरियात कॉन्स्टेबल कुलविंदर कौर यांनी आपल्याशी गैरवर्तन केलं आणि आपल्याला थोबाडीत ठेवून दिली. या घटनेनंतर कुलविंदर कौर यांना ताब्यात घेण्यात आलं आहे. त्यांची चौकशी सुरु आहे. चंदीगढ एअरपोर्टवर असलेलं सीसीटीव्ही फुटेजही तपासण्यात आलं.

कंगना रणौत यांचा आरोप काय?

“कुलविंदर कौर यांनी कर्टन रुममध्ये माझ्याशी गैरवर्तन केलं आणि मला श्रीमुखात भडकावली. तसंच त्यानंतर शिवीगाळ करण्यासही सुरुवात केली. मी त्यांना विचारलं की माझ्याशी असं का वागलात? त्यावर ती म्हणाली की शेतकरी आंदोलनाची ती समर्थक आहे. तुम्ही त्याबद्दल योग्य वक्तव्य केलं नव्हतं.” यानंतर मी तिची तक्रार केली. असं कंगना यांनी म्हटलं आहे.

हे पण वाचा- कंगना रणौत यांच्या कानशिलात लगावल्याचं प्रकरण; संजय राऊत म्हणाले, “मला त्यांच्याबद्दल सहानुभूती, मात्र…”

कोण आहेत कुलविंदर कौर?

कंगना रणौत यांच्याशी गैरवर्तन केल्याचा आरोप असलेल्या कुलविंदर कौर या सीआयएसफमध्ये कॉन्स्टेबल आहेत. त्या ३५ वर्षीय आहेत. त्यांचं कुटुंब सुल्तानपूर येथील लोधी या ठिकाणी राहतं. मागच्या १५ वर्षांपासून कुलविंदर कौर या सीआयएसएफमध्ये काम करतात. आजवर त्यांच्या कारकिर्दीला कुठलाही कलंक लागलेला नाही.

कुलविंदर कौर या कर्तव्य बजावत असताना कधीही त्यात कसूर करत नाहीत. हे त्यांचं १५ वर्षांचं रेकॉर्ड सांगतं आहे. कुलविंदर कौर या कपूरथला या ठिकाणी त्यांच्या पतीसह राहतात. त्यांना दोन मुलं आहेत. त्यांचा भाऊ शेर सिंह हे शेतकरी नेते आहेत. तर किसान मजदूर संघर्ष समितीत ते सचिव आहेत.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

कुलविंदर कौर यांचं निलंबन

सीआयएसएफच्या महिला सुरक्षारक्षक कर्मचारी कुलविंदर कौर यांना या प्रकरणी निलंबित करण्यात आले आहे. अभिनेत्री कंगना रणौत यांना कानशिलात मारल्याच्या आरोपा प्रकरणी स्थानिक पोलीस ठाण्यात सीआयएसएफ महिला सुरक्षारक्षक कुलविंदर कौर यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तसेच या प्रकरणी या महिला सुरक्षारक्षकाची चौकशी सुरू असून त्यांनी कंगना रणौत यांना थोबाडीत का मारली? त्यामागील कारण काय? यासंदर्भातील चौकशी पोलिसांकाडून सुरू आहे.