Who is Taliban Foreign Minister Amir Khan Muttaki: तालिबानचे परराष्ट्रमंत्री अमीर खान मुत्ताकी सध्या भारत दौऱ्यावर आहेत. त्यांनी काल (शुक्रवारी) पाकिस्तानला इशारा दिला की, “पाकिस्तानने अफगाणिस्तानच्या धैर्याची परीक्षा घेऊ नये. पाकिस्तानचे आमच्या देशात केलेले हल्ले चुकीचे आहेत. अफगाणिस्तानात ४० वर्षांनंतर शांतता आणि प्रगती सुरू झाली आहे. जर कोणाला असे करायचे असेल, तर त्यांनी आधी सोव्हिएत युनियन, अमेरिका आणि नाटोला विचारावे, जेणेकरून ते अफगाणिस्तानशी खेळ करणे चांगले नाही, हे योग्य प्रकारे सांगू शकतील.”
अमीर खान मुत्ताकी कोण आहेत?
१९७० मध्ये हेलमंड प्रांतात जन्मलेले अमीर खान मुत्ताकी हे तालिबानचे अनेक दशकांपासून सदस्य आहेत. द इंडियन एक्सप्रेसने दिलेल्या वृत्तानुसार, सोव्हिएत संघाने अफगाणिस्तानवर आक्रमण केल्यानंतर ते वयाच्या नवव्या वर्षी पाकिस्तानात गेले आणि अफगाण निर्वासितांसाठी असलेल्या धार्मिक शाळांमध्ये शिक्षण घेतले.
मुत्ताकी १९९४ मध्ये तालिबान चळवळीत सहभागी झाले आणि या तालिबानने कंधार ताब्यात घेतल्यानंतर त्यांना कंधार रेडिओ स्टेशनचे महासंचालक म्हणून नियुक्त करण्यात आले. पुढे ते तालिबान उच्च परिषदेचे सदस्य बनले. २००० मध्ये त्यांना शिक्षणमंत्री बनवण्यात आले होते आणि २००१ मध्ये अमेरिकेच्या आक्रमणापर्यंत त्यांनी ही जबाबदारी पाहिली.
नंतर २०१९ मध्ये अमेरिकेसोबतच्या चर्चेदरम्यान ते तालिबानच्या वाटाघाटी पथकाचा भाग बनले आणि ऑगस्ट २०२१ मध्ये तालिबान सत्तेत आल्यापासून त्यांनी परराष्ट्र व्यवहारमंत्री म्हणून जबाबदारी स्वीकारली.
भारत-अफगाणिस्तान संबंध
गेल्या काही महिन्यांत दहशतवादी कारवायांमुळे अफगाणिस्तान आणि पाकिस्तानमधील संबंध ताणले गेले आहेत. या तणावपूर्ण संबंधांमुळे भारताला तालिबानशी संबंध वाढवण्याची संधी मिळाली आहे.
काल (शुक्रवारी) मुत्ताकी यांनी हैदराबाद हाऊस येथे परराष्ट्रमंत्री डॉ. एस. जयशंकर यांच्यासोबत उच्चस्तरीय बैठक घेतली. या बैठकीत भारताने काबूलमधील आपला दूतावास पुन्हा सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे.
पाकिस्तानला इशारा
अमीर खान मुत्ताकी यांनी अफगाणिस्तानातील कारवायांबद्दल पाकिस्तानला कठोर इशाराही दिला. “आम्ही पाकिस्तान सरकारला इशारा देऊ इच्छितो की, या दृष्टिकोनातून समस्या सोडवल्या जाऊ शकत नाहीत. अफगाणिस्तानात पाकिस्तानच्या कृतीचा आम्ही निषेध करतो. अफगाणिस्तानातील लोकांच्या संयमाला आणि धैर्याला आव्हान देऊ नये”, असे ते म्हणाले.