Who was ADGP Y Puran Kumar : हरियाणाचे अतिरिक्त पोलीस महासंचालक (एडीजीपी) वाय. पूरन कुमार हे मंगळवारी (७ ऑक्टोबर) त्यांच्या चंदीगडच्या सेक्टर ११ मधील राहत्या घरात मृतावस्थेत आढळले. त्यांच्या डोक्यात गोळी लागली होती. त्यांनी आत्महत्या केली असावी असा संशय पोलिसांनी प्राथमिक तपासानंतर व्यक्त केला आहे. या घटनेने देशभर एकच खळबळ उडाली आहे. पोलिसांनी घटनास्थळी तपास केल्यानंतर त्यांना पूरन कुमार यांचं मृत्यूपत्र व एक सुसाइड नोट सापडली आहे.

पूरन कुमार यांनी सुसाइड नोटमध्ये कार्यालयातील समस्यांचा उल्लेख केला आहे. तसेच ते कामाच्या ठिकाणी समाधानी नसल्याचं त्यांच्या पत्रातून स्पष्ट झालं आहे. या सुसाइड नोटची फॉरेन्सिक तपासणी केली जाणार आहे. ही पूरन कुमार यांचीच सुसाइड नोट असल्याची खात्री झाल्यानंतरच ती माध्यमांबरोबर शेअर केली जाईल असं पोलिसांनी सांगितलं आहे.

राहत्या घरात आत्महत्या

पूरन कुमार हे २००१ च्या बॅचचे आयपीएस अधिकारी होते. कुमार हे हरियाणा केडरमधील वरिष्ठ आयपीएस अधिकारी होते. त्यांनी त्यांच्या कारकिर्दीत अनेक महत्त्वाची पदं भूषवली होती. त्यांनी सोमवारी त्यांच्या गनमॅनकडून पिस्तूल (सर्व्हिस रिव्हॉल्वर) घेतलं. त्यानंतर मंगळवारी दुपारी ते त्यांच्या घरातील बेसमेंटमध्ये (तळघर) मृतावस्थेत आढळले. त्यांच्या डोक्याला गोळी लागली होती आणि हातात त्यांची सर्व्हिस रिव्हॉल्वर होती.

नऊ दिवसांपूर्वी बदली

पूरन कुमार यांची नऊ दिवसांपूर्वीच बदली झाली होती. पीटीसी सुनारियाचे पोलीस महानिरीक्षक म्हणून त्यांनी पदभार स्वीकारला होता. आत्महत्या केली तेव्हा ते रजेवर होते.

पत्नी देखील आहे आयएएस अधिकारी

वाय. पूरन कुमार यांची पत्नी वरिष्ठ आयएएस अधिकारी आहे. अमनीत पी. कुमार असं त्यांचं नाव असून त्या २००१ च्या बॅचच्या हरियाणा केडरच्या आयएएस अधिकारी आहेत. पूरन कुमार यांनी आत्महत्या केली तेव्हा त्या हरियाणाचे मुख्यमंत्री नायब सिंह सैनी यांच्याबरोबर जपान दौऱ्यावर गेल्या होत्या. सैनी यांच्याबरोबर वरिष्ठ प्रशासकीय अधिकाऱ्यांचं एक शिष्टमंडळ जपान दौऱ्यावर गेलं असून अमनीत पी. कुमार या देखील सदर शिष्टमंडळातील सदस्य आहेत.

दरम्यान, पोलिसांनी स्पष्ट केलं आहे की “आम्ही सध्या वाय. पूरन कुमार यांच्या आत्महत्येचं कारण शोधण्याचा प्रयत्न करत आहोत. सर्व संभाव्य शक्यता तपासून पाहात आहोत. लवकरच या प्रकरणाचा निष्पक्ष खुलासा करू.”