Prakash Ambedkar on Ceasfire Between India Pakistan : तीन दिवसांच्या तीव्र संघर्षानंतर भारत-पाकिस्तान यांच्यात शस्त्रविरामावर शनिवारी सहमती झाली. पाकिस्तानने प्रस्ताव ठेवल्यानंतर संध्याकाळी ५ वाजल्यापासून शस्त्रविरामावर सहमती झाल्याची माहिती परराष्ट्र मंत्रालयाने दिली. मात्र त्याच वेळी यापुढे भारताविरोधात कुरापती न करण्याची सज्जड ताकीदही पाकिस्तानला देण्यात आली. शस्त्रविराम करताना भारताने कोणत्याही अटी-शर्ती मान्य केलेल्या नाहीत. दरम्यान, शस्त्रविरामाची घोषणा अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी का केली हा जगभर चर्चेचा विषय ठरला आहे. यावरूनच वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी प्रश्न उपस्थित केले आहेत. त्यांनी एक्सवर यासंदर्भात पोस्ट केली आहे.

“प्रकाश आंबेडकर म्हणाले, “परकीय आक्रमणाला प्रतिसाद देण्यासाठी मी नेहमीच भारत सरकार आणि भारतीय सशस्त्र दलांना पाठिंबा दिला आहे आणि नेहमीच पाठिंबा देईन. परंतु आपल्या प्रिय राष्ट्राच्या हितासाठी माझे काही प्रश्न, चिंता आणि सूचना आहेत जे मी मांडू इच्छितो”, असं म्हणत प्रकाश आंबेडकर यांनी डोनाल्ड ट्रम्प यांनी शस्त्रविरामाबाबत केलेल्या घोषणेवर शंका निर्माण केली आहे.

अमेरिकेचे वक्तव्य मोठेपणा मिरवणारे

“शस्त्रविरामाची बातमी आपल्याला पहिल्यांदा अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांकडून का ऐकायला मिळाली? पंतप्रधान नरेंद्र मोदी किंवा परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर यांच्याकडून ही बातमी का ऐकायला मिळाली नाही? अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान आपल्या राष्ट्र आणि परराष्ट्र धोरणाबद्दल उपकार केल्यासारखे आणि मोठेपणा मिरवण्यासारखे होते. कारण, परराष्ट्र मंत्रालयाच्या मीडिया ब्रीफिंगवरून हे स्पष्ट झाले की या निर्णायत आपल्याच देशाचा पुढाकार होता”, असं प्रकाश आंबेडकर म्हणाले.

अमेरिकेला पाकिस्तानच्या मनात घर करायचे होते का?

“त्यामुळे पाकिस्तान आक्रमक असताना आपण अमेरिकेचे ऐकले आणि शस्त्रविराम का मान्य केले का? अमेरिकेने पाकिस्तानला वाचवण्यासाठी आणि त्यांचा विश्वास संपादन करण्यासाठी आम्हाला शस्त्रविराम करण्यास भाग पाडले का? चीनसारख्या इतर जागतिक शक्तींशी धोरणात्मक भागीदारी स्थापित करून पाकिस्तानने अमेरिकेच्या आर्थिक आणि लष्करी मदतीवरील आपले अवलंबित्व लक्षणीयरीत्या कमी केले आहे. त्यामुळे अमेरिकेला पुन्हा पाकिस्तानच्या मनात घर करायचे होते का?” असाही प्रश्न त्यांनी उपस्थित केला.

…अन् आपण संधी गमावली

“पाकिस्तानकडे असलेले मर्यादित दारूगोळे फक्त १० दिवस टिकू शकले असते. पाकिस्तान आणि त्याच्या पुरस्कृत दहशतवादाला कायमचे संपवण्याची संधी आमच्याकडे होती आणि आम्ही ही संधी गमावली”, असंही ते म्हणाले.

तुर्की, अझरबैजान आणि चीन पाकिस्तानच्या समर्थनार्थ आले

भारतावर हल्ला करण्यासाठी पाकिस्तानने अमेरिका, चीन आणि तुर्की यांनी पुरवलेल्या लष्करी उपकरणांचा वापर केला. ८ मे च्या रात्री, भारतीय सैन्याने अभूतपूर्व ड्रोन घुसखोरी पाहिली, ३०० ते ४०० हून अधिक मानवरहित हवाई वाहनांनी ३६ वेगवेगळ्या ठिकाणी भारतीय हद्दीत घुसण्याचा प्रयत्न केला. एका मीडिया ब्रीफिंग दरम्यान, विंग कमांडर व्योमिका सिंग आणि कर्नल सोफिया कुरेशी यांनी पुष्टी केली की वापरलेले ड्रोन तुर्की संरक्षण कंपनी असिसगार्डने बनवलेले सोंगर सशस्त्र ड्रोन सिस्टम होते. पाकिस्तानमध्ये पाकिस्तानी सैन्याच्या उपस्थितीत दहशतवाद्यांचे शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले. तुर्की, अझरबैजान आणि चीन पाकिस्तानच्या समर्थनार्थ आले”, असा दावाही त्यांनी केला.

“भविष्यात भारताच्या भूभागावर पाकिस्तान पुरस्कृत दहशतवादाची जबाबदारी अमेरिका, तुर्की, अझरबैजान आणि चीन घेतील का? पाकिस्तानच्या पुरस्कृत दहशतवादाला आपण दिलेल्या प्रतिसादामुळे भविष्यात आपल्या भूमीवर पाकिस्तान दहशतवाद करण्यापासून परावृत्त झाला आहे का? पाकिस्तान आणि त्याच्या पुरस्कृत दहशतवादाला रोखण्यासाठी आपल्याला प्रभावी धोरणात्मक लष्करी दृष्टिकोनाची आवश्यकता आहे!” असंही ते म्हणाले.

“भारताने पाकिस्तानला वाईटाचा अक्ष म्हणून प्रादेशिक आणि आर्थिकदृष्ट्या वेगळे करण्यासाठी सर्व राजनैतिक, आर्थिक, कायदेशीर किंवा इतर उपाययोजना वापरल्या पाहिजेत. भारताने पाकिस्तानला FATF च्या ग्रे लिस्टमध्ये टाकण्यासाठी आणि युरोपियन युनियनमध्ये वेगळे करण्यासाठी प्रयत्न सुरू केले पाहिजेत! भारताने तिबेट धोरणाचा पुनर्विचार करावा”, असा सल्लाही त्यांनी दिला आहे.