Nitish Kumar On Bihar Assembly Election : बिहार विधानसभा निवडणुकीचा बिगुल वाजला असल्याने राजकीय पक्षांनी प्रचाराला जोरदार सुरूवात केली आहे. बिहारमध्ये नोव्हेंबर महिन्यात दोन टप्प्यात विधानसभा निवडणूक पार पडणार आहे. या निवडणुकीत भाजपाप्रणीत राष्ट्रीय लोकशाही आघाडी आणि विरोधकांचं महागठबंधन आणि प्रशांत किशोर यांचा जन सुराज पक्ष निवडणुकीच्या रिंगणात असल्यामुळे निवडणुकीतील रंगत आणखी वाढली आहे.
सध्या सर्वच पक्षांच्या प्रचाराने जोर धरला असून सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये आरोप-प्रत्यारोप सुरू आहेत. यातच आज बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी एक मोठं विधान केलं आहे. जेव्हा त्यांची राष्ट्रीय जनता दलाबरोबर (आरजेडी) युती होती, त्याबाबत नितीश कुमार यांनी भाष्य करत आपण एनडीएबरोबर जाण्याचा निर्णय का घेतला? याचं कारणही त्यांनी सांगितलं. या संदर्भातील वृत्त टाईम्स ऑफ इंडियाने दिलं आहे.
मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी त्यांच्या २० वर्षांच्या कार्यकाळापूर्वीच्या आरजेडीच्या राजवटीवरही टीका केली. ‘पहले बहुत बुरा हाल था’, असं म्हणत लालू प्रसाद यादव आणि राबडी देवी यांच्या सरकारच्या उणीवा त्यांनी अधोरेखित केल्या.
मुझफ्फरपूरच्या मीनापूर येथे निवडणूक सभेला संबोधित करताना नितीश कुमार म्हणाले की, “परिस्थितीमुळे मला त्या लोकांशी हातमिळवणी करावी लागली होती. मात्र, ते काहीही कामाचे नव्हते, हे मला समजण्याला जास्त वेळ लागला नाही. आता मी कायमचा एनडीएमध्ये परतलो आहे.” दरम्यान, बिहारमधील पायाभूत सुविधा, शिक्षण आणि आरोग्यसेवा सुधारण्यावर त्यांचं सरकार लक्ष केंद्रित करत असल्याचं त्यांनी सांगितलं आणि केंद्रातील नरेंद्र मोदी सरकारच्या पाठिंब्याचंही त्यांनी कौतुक केलं.
तसेच बिहारमधील कायदा आणि सुव्यवस्थेबद्दल बोलताना नितीश कुमार म्हणाले, “मी पदभार स्वीकारेपर्यंत बिहारमध्ये कायदा आणि सुव्यवस्थेच्या कमकुवतपणामुळे आणि गुन्हेगारांना कथित संरक्षण मिळाल्यामुळे दहशतीचं वातावरण होतं. पण आता परिस्थिती किती बदलली आहे, हे सर्वांनाच पाहायचं आहे. जातीय सलोखा देखील सुधारला आहे. हिंदू आणि मुस्लिमांमधील वाद देखील कमी झाले आहेत.”
