Why IPS Puran Kumar Shoots Himself Suicide Note explains Reason : हरियाणाचे अतिरिक्त पोलीस महासंचालक (एडीजीपी) वाय. पूरन कुमार हे मंगळवारी त्यांच्या चंदीगडमधील राहत्या घरात मृतावस्थेत आढळले. त्यांच्या डोक्यात गोळी लागली होती. त्यांनी आत्महत्या केली असावी असा संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे. या घटनेने देशभर एकच खळबळ उडाली आहे. सुरुवातीला त्यांच्याजवळ कोणतीही सुसाइड नोट (पत्र) सापडली नव्हती. मात्र, पोलिसांनी घटनास्थळी तपास केल्यानंतर पूरन कुमार यांचं मृत्यूपत्र व सुसाइड नोट सापडली आहे. यामध्ये त्यांनी कार्यालयातील समस्यांचा उल्लेख केला आहे. तसेच ते कामाच्या ठिकाणी समाधानी नसल्याचं त्यांच्या पत्रातून स्पष्ट झालं आहे.

चंदीगडच्या वरिष्ठ पोलीस अधीक्षक (एसएसपी) कंवरदीप कौर यांनी या घटनेची माहिती देताना सांगितलं की दुपारी १.३० च्या सुमारास पूरन कुमार यांनी घराच्या साउंडप्रूफ बेसमेंटमध्ये (तळघर) स्वतःवर गोळी झाडली. त्यांनी सर्व्हिस रिव्हॉल्वरद्वारे डोक्यात गोळी झाडून आयुष्य संपवलं. तसेच आत्महत्येपूर्वी त्यांनी त्यांच्या सर्व सुरक्षा रक्षकांना घराबाहेर जाण्याचे आदेश दिले होते. सुरक्षारक्षक व कर्मचारी बाहेर गेल्यानंतर ते तळघरात गेले आणि तिथल्या खुर्चीत बसून त्यांनी डोक्यात गोळी झाडली.

पूरन कुमार यांची २९ सप्टेंबर रोजी बदली झाली होती. घटनेच्या वेळी ते रजेवर होते. पोलिसांचं पथक व न्यायवैद्यक तज्ज्ञ (फॉरेन्सिक टीम) या घटनेचा तपास करत आहेत.

पूरन कुमार यांची पत्नी आहे आयएएस अधिकारी

वाय. पूरन कुमार यांची पत्नी आयएएस अधिकारी आहे. अमनीत पी. कुमार असं त्यांचं नाव असून त्या २००१ च्या बॅचच्या हरियाणा केडरच्या आयएएस अधिकारी आहेत. घटना घडली तेव्हा त्या मुख्यमंत्री नायब सिंह सैनी यांच्याबरोबर जपान दौऱ्यावर गेल्या होत्या. सैनी यांच्याबरोबर वरिष्ठ प्रशासकीय अधिकाऱ्यांचं एक शिष्टमंडळ जपान दौऱ्यावर गेलं असून पूरन यांच्या पत्नी या शिष्टमंडळातील सदस्य आहेत. कुमार हे हरियाणा केडरमधील वरिष्ठ आयपीएस अधिकारी होते. त्यांनी त्यांच्या कारकिर्दीत अनेक महत्त्वाची पदं भूषवली होती.

पूरन कुमार यांचे वरिष्ठ अधिकाऱ्यांशी वाद

इंडिया टूडेच्या वृत्तानुसार पूरन कुमार यांचे अनेक वरिष्ठ अधिकाऱ्यांशी वाद होते. बेकायदेशीर पदोन्नती, जातीय भेदभाव, प्रशासनिक छळ यांसारख्या मुद्द्यांवरून त्यांनी मुख्यमंत्री व अनेक वरिष्ठ अधिकाऱ्यांना पत्रे लिहून नाराजी व्यक्त केली होती. तसेच, या प्रकरणी लक्ष घालण्याची विनंती केली होती. गृह मंत्रालयाच्या नियमांचं उल्लंघन, अनुसूचित जातीच्या आयपीएस अधिकाऱ्यांच्या बाबतीत होणारा भेदभाव, त्यांच्या नियुक्त्यांमधील पक्षपाती वागणूक याबाबत त्यांनी तक्रारी केल्या होत्या.

दरम्यान, या मृत्यूप्रकरणाचा तपास करणाऱ्या पोलिसांनी सांगितलं की पूरन कुमार यांचा मृतदेह ज्या खोलीत आढळला तिथेच एक सुसाइड नोट सापडली आहे. आम्ही या सुसाइड नोटची फॉरेन्सिक तपासणी करत आहोत. ती त्यांचीच सुसाइड नोट होती याची खातरजमा झाल्यानंतर आम्ही ती सार्वजनिक करू.