जम्मू काश्मीरमधील माछिल सेक्टरमध्ये मंगळवारी दहशतवाद्यांसोबतच्या चकमकीत भारताचे तीन जवान शहीद झाले आहेत. चकमकीनंतर दहशतवाद्यांनी भारताच्या एका जवानाच्या मृतदेहाची विटंबना केल्याचेही समोर आले आहे. गेल्या काही काळापासून माछिल सेक्टर हा दहशतवाद्यांसाठी भारतात घुसखोरी करण्याचा सोपा मार्ग असल्याचे दिसून आले आहे. नियंत्रण रेषेपलीकडून काश्मीरच्या कुपवाडा जिल्ह्यात घुसखोरी करण्याचा सर्वात लहान आणि सुरक्षित मार्ग म्हणून माछिल सेक्टर पुन्हा एकदा प्रकाशझोतात आले आहे.

माछिल परिसराच्या भौगोलिक रचनेमुळे दहशतवाद्यांना घुसखोरी करताना फायदा मिळतो. माछिल सेक्टर हे समुद्रसपाटीपासून साडेसहा हजार फुटांवर असून या भागात घनदाट जंगल आहे. याशिवाय, हवामान आणि लष्करी गस्त घालण्याचा विचार करता हा भूभाग प्रतिकूल मानला जातो. या भागातील भारतीय आणि पाकिस्तानी लष्कराच्या बंकर्समधील अंतरही फार कमी आहे. भारताच्या हद्दीतील कुपवाडा हे शहरदेखील या बंकर्स आणि नियंत्रण रेषेपासून अवघ्या ५० ते ८० किलोमीटर अंतरावर आहे. त्यामुळे या भागात अनेकदा दहशतवादी आणि भारतीय लष्करामध्ये चकमकी होतात.

सूत्रांच्या माहितीनुसार, या परिसरातून कुपवाडा आणि लोलाब खोऱ्यात घुसखोरी करण्यासाठी दहशतवाद्यांना अनेक मार्ग उपलब्ध आहेत. भारतीय सैन्याच्या सर्जिकल स्ट्राईकनंतर चवताळलेल्या पाकिस्तानकडून या भागात मोठ्याप्रमाणावर शस्त्रसंधीचे उल्लंघन सुरू आहे. २९ ऑक्टोबरला याठिकाणी झालेल्या गोळीबारात सीमा सुरक्षा दलाचे (बीएसएफ) नितीन सुभाष आणि मनदीप सिंग हे जवान धारातीर्थी पडले होते. तेव्हादेखील दहशतवाद्यांनी मनदीप सिंग यांच्या मृतदेहाची विटंबना केली होती. गेल्या काही महिन्यांत माछिल सेक्टरमध्ये चारपेक्षा जास्तवेळा घुसखोरी करण्याचा प्रयत्न झाला आहे. गेल्यावर्षीच्या डिसेंबर महिन्यात ४१ राष्ट्रीय रायफल्सचे संतोष महाडिक दहशतवादी हल्ल्यात धारातीर्थी पडल्यानंतर भारतीय सैन्याने मनिगह ते माछिल या परिसरात मोठी शोध मोहिम हाती घेतली होती. येथील हैहामा आणि कालारूस येथील दाट जंगलांमध्ये दहशतवादी लपल्याची माहिती सैन्याला मिळाली होती. मात्र, या मोहिमेत ७०० पेक्षा अधिक जवान आणि पॅरा ट्रुपर्सची विशेष पथके असूनही भारतीय सैन्याच्या हाती फारसे काही लागले नव्हते. पाकिस्तानी सैनिक किंवा दहशतवादी कोणाच्याही दृष्टीस न पडता हाजीनाका ते माछिलपर्यंत सहज येऊ शकतात, अशी माहिती एका पोलीस अधिकाऱ्याने दिली. गेल्यावर्षी ऑगस्ट महिन्यात याच परिसरात दहशतवाद्यांनी केलेल्या हल्ल्यात तीन भारतीय जवान शहीद झाले होते. त्यावेळी हल्ला झाला ते ठिकाण नियंत्रण रेषेपासून अवघ्या सहा किलोमीटर अंतरावर होते. नियंत्रण रेषेपलीकडे अवघ्या काही किलोमीटर अंतरावर असणाऱ्या काली या गावात दहशतवाद्यांचा मोठा तळ असल्याचीही माहिती आहे.