पूर्व लडाखच्या गलवान व्हॅलीमध्ये १५ जून २०२० रोजी चीनसोबत झालेल्या संघर्षात शहीद झालेले बिहारचे नाईक दीपक सिंह यांची २३ वर्षीय पत्नी रेखा देवी यांनीही आपल्या पतीच्या मार्गावर जाण्याचा निर्णय घेतला आहे. रेखा देवी या मूळच्या मध्य प्रदेशातील रीवा येथील असून त्यांनी सैन्यात भरती होण्यासाठी महत्त्वाची परीक्षा उत्तीर्ण केली आहे. त्या लष्करात अधिकारी म्हणून काम करणार आहे.
शहीद दीपक सिंह बिहार रेजिमेंटच्या १६ व्या बटालियनमध्ये होते. गलवान खोऱ्यात चिनी सैनिकांना हुसकावून लावताना ते शहीद झाले होते. गेल्या वर्षी नोव्हेंबरमध्ये राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या हस्ते त्यांना मरणोत्तर वीर चक्र प्रदान करण्यात आले होते. दीपक सिंह यांच्या पत्नी रेखा देवी यांना हा सन्मान मिळाला होता. परमवीर चक्र आणि महावीर चक्रानंतर वीर चक्र हा देशातील तिसरा सर्वोच्च सन्मान आहे.




पाच दिवस चाललेल्या मुलाखतीनंतर निवड
रेखा देवी गेल्या शुक्रवारी सेवा निवड मंडळाच्या परीक्षेत उत्तीर्ण झाल्या. लष्कराच्या अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार, अलाहाबादमध्ये पाच दिवसांच्या मुलाखतीनंतर त्यांची निवड करण्यात आली. आता त्यांना चेन्नईमध्ये प्री-सर्व्हिस ट्रेनिंग (ओटीए) दिले जाईल. केंद्रीय लोकसेवा आयोगाने निवडलेल्या उमेदवारांची यादी जाहीर करण्यापूर्वी रेखा देवी यांना वैद्यकीय चाचणी उत्तीर्ण करावी लागेल.
शहिदांच्या पत्नींना सूट
शहीद सैनिक आणि अधिकार्यांच्या पत्नींना सैन्यात सामील होण्याच्या उद्देशाने यूपीएसीद्वारे आयोजित संयुक्त संरक्षण सेवा परीक्षा (सीडीएस) मध्ये बसण्यापासून सूट देण्यात आली आहे. यामध्ये उत्तीर्ण झाल्यानंतरच एसएसबी मुलाखतीसाठी पात्रता आहे. शहिदांच्या पत्नींना वयात सवलत मिळते. तथापि, ओटीएसाठी वयोमर्यादा १९ ते २५ वर्षे आहे.
वैद्यकीय सहाय्यक होते नाईक दीपक सिंह
नाईक दीपक सिंह हे लष्करात वैद्यकीय सहाय्यक होते. त्यांनी वेळीच उपचार करून ३० भारतीय जवानांचे प्राण वाचवले. सात तास चाललेल्या गलवान खोऱ्यातील संघर्षात २० भारतीय जवान शहीद झाले. त्याचवेळी चीनचे ४० हून अधिक सैनिक आणि अधिकारीही मारले गेले. संघर्षादरम्यान जखमी जवानांच्या मदतीसाठी नाईक दीपक सिंह हे आघाडीवर पोहोचले होते. यादरम्यान चिनी सैनिकांनी मारलेला दगड त्याच्या डोक्याला लागला. यानंतरही त्यांनी अनेक जखमी सैनिकांना मदत केली. मात्र, नंतर दीपक सिंह यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला.