भाजपात प्रवेश केलेल्या सुजय विखे यांच्याविरोधात आपण प्रचार करणार नाही असे सूचक विधान त्यांचे वडील विरोधीपक्ष नेते आणि काँग्रेसचे नेते राधाकृष्ण विखे-पाटील यांनी केले आहे. त्यामुळे आघाडीची आणखीनच अडचण होण्याची शक्यता आहे. कारण विखे-पाटीलांचा नगरमध्ये चांगला प्रभाव आहे.

पत्रकार परिषदेत विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना विखे-पाटील म्हणाले, शरद पवारांनी एकदा नव्हे दोनदा माझे वडील बाळासाहेब विखेंबाबत उपहासात्मक विधान केले. त्यांचे विखे कुटुंबाबाबत चांगले मत नाही, त्यामुळे मी नगरमध्ये प्रचार करणार नाही. कारण पवारांनी जे मत व्यक्त केलंय, त्यानंतरही मी नगरमध्ये त्यांच्या उमेदवारासाठी प्रचार केल्यास त्यांच्या मनात संशयाचं वातावरण निर्माण होईल आणि तसं व्हावं हा माझा हेतू नाही.

नगरमध्ये राष्ट्रवादीच्या उमेदवारासाठी आपण प्रचार करणार नसल्याचे जरी विखे-पाटलांनी म्हटले असले तरी आघाडीच्या उमेदवाराविरोधात भाजपाकडून त्यांचे पुत्र सुजय विखेंना उमेदवारी मिळण्याचे निश्चित मानले जात आहे. त्यामुळेच जर सुजय विखे नगरमधून भाजपाचे उमेदवार असतील तर त्यांच्याविरोधात राधाकृष्ण विखे-पाटील प्रचार करणार नाहीत, हे स्पष्ट होते.

तसेच उर्वरीत मी महाराष्ट्रात आघाडीच्या उमेदवारांसाठी कुठे प्रचार करायचा किंवा नाही हे काँग्रेस पक्ष आणि सुशील कुमार शिंदेंच्या अध्यक्षतेखालील प्रचार समिती ठरवेल. त्यामुळे ते जे ठरवतील त्याप्रमाणे मी प्रचार करेन, असेही यावेळी राधाकृष्ण विखे-पाटलांनी स्पष्ट केले.