Dhirendra Brahamachari : भारताच्या दिवंगत माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांचे गुरु अशी ओळख असलेले धीरेंद्र ब्रह्मचारी यांची संपूर्ण संपत्ती सरकार जमा होणार का? हा प्रश्न सध्या चर्चेत आहे. साधू किंवा संन्यासी यांच्या मृत्यूनंतर त्यांची संपत्ती, मालमत्ता ही सरकार जमा होते असा नियमच आहे. धीरेंद्र ब्रह्मचारी यांच्या प्रकरणात पंजाब आणि हरियाणा न्यायालयाने हरियाणा सरकारला ही विचारणा केली आहे की त्यांनी धीरेंद्र ब्रह्मचारींची संपत्ती ताब्यात घेतली आहे का? याचं उत्तर देण्यास त्यांनी हरियाणा सरकारला मुदत दिली आहे.

उच्च न्यायालयाच्या माहितीनुसार धीरेंद्र ब्रह्मचारी यांनी संन्यास घेतला होता. त्यामुळे त्यांच्यानंतर त्यांची संपूर्ण संपत्ती राज्य सरकारकडे जमा व्हायला हवी होती. या प्रकरणी आता २९ मे रोजी सुनावणी केली जाणार आहे. त्यामध्ये काय घडणार हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे.

धीरेंद्र ब्रह्मचारींची संपत्ती सरकार जमा होणार?

उच्च न्यायालयाने हरियाणा सरकारच्या वकिलांना विचारणा केली आहे की सरकार ही संपत्ती कधी ताब्यात घेणार? न्यायालयाने हेदेखील म्हटलं आहे की धीरेंद्र ब्रह्मचारी हे एक संन्यासी होते. त्यांनी एका सोसायटीची स्थापना केली होती. त्यानंतर त्यांनी संन्यास घेण्याचा निर्णय जाहीर केला. अशा प्रकारे जर कुणीही संन्यासी त्यांची संपत्ती मागे सोडून जात असतील तर ती संपत्ती मालक नसलेली संपत्ती किंवा मालमत्ता असते. त्यानुसार ही संपत्ती सरकार जमा झाली पाहिजे. कारण संन्यासी धीरेंद्र ब्रह्मचारी यांचा मृत्यू झाला आहे.

उच्च न्यायालयाने आणखी काय म्हटलं आहे?

कोर्टाने असंही म्हटलं आहे की स्वामी धीरेंद्र ब्रह्मचारी यांची संपत्ती राज्य सरकारकडे जमा झाली पाहिजे. जस्टिस राजबीर सहरावत यांनी अपर्णा आश्रम सोसायटी आणि एका व्यक्तीद्वारे दाखल करण्यात आलेल्या याचिकेवर सुनावणी करताना हा आदेश जारी केला आहे. काही लोक या सोसायटीचा दुरुपयोग कत आहेत, त्यासाठी त्यांना दोषी ठरवण्यात आलं आहे. तसंच काही लोक या अपर्णा आश्रमाची जागा विकत आहेत असंही समोर आलं होतं. ज्यानंतर हा आदेश देण्यात आला. टाइम्स ऑफ इंडियाने हे वृत्त दिलं आहे. याआधी एप्रिल २०२३ मध्ये उच्च न्यायालयाने काही खासगी कंपन्यांनी दाखल केलेल्या याचिकाही फेटाळल्या होत्या.

हे पण वाचा- अमेठी, रायबरेली आणि वायनाडबाबतच्या निर्णयातून काँग्रेसला नेमके काय साधायचे आहे?

धीरेंद्र ब्रह्मचारी यांच्या संपत्तीचा वाद काय आहे?

धीरेंद्र ब्रह्मचारी यांच्या मृत्यूनंतर त्यांचे एक नातेवाईक आणि एक भाडेकरु सिलोखरा गावातील मालमत्तेचा मालकी हक्क मिळावा म्हणून कायदेशीर लढाई लढत आहेत. हे प्रकरण २४ एकर जमिनीच्या मालकीचं आहे. एक काळ असा होता की या जमिनीवर धावपट्टी होती. त्याची मालकी १९८० च्या दशकापासून अपर्णा आश्रमाचे संस्थापक आणि इंदिरा गांधींचे गुरु धीरेंद्र ब्रह्मचारींकडे होती. जून १९९४ मध्ये त्यांचा विमान अपघातात मृत्यू झाला. त्यानंतर त्यांची संपत्ती आणि ही मालमत्ता यांचा वाद निर्माण झाला.

धीरेंद्र ब्रह्मचारी यांनी १९८३-८४ च्या दरम्यान अपर्णा आश्रम सोसायटीची नोंदणी रजिस्ट्रार ऑफ सोसायटीज दिल्लीमध्ये केली होती. या सोसायटीचे प्रतिनिधी आहोत असं सांगणाऱ्या दोघांनी २७ डिसेंबर २०२० रोजी ५५ कोटींच्या मोबदल्यात ही जमीन दिल्लीच्या चार कंपन्यांच्या नावे ट्रान्सफर करण्याचं ठरवलं होतं. मात्र डीसी गुडगावने विक्री करार रद्द केला होता.

धीरेंद्र ब्रह्मचारी हे पंडीत नेहरु आणि इंदिरा गांधींचे योग गुरु

धीरेंद्र १९५८ मध्ये दिल्लीला पोहोचले. इंदिरा गांधींसह त्यांची पहिली भेट काश्मीरमधील शिकारगडमध्ये झाली होती. धीरेंद्र ब्रह्मचारींनी आधी पंडित नेहरूंना योग शिकवायला सुरुवात केली. त्यानंतर काही दिवसांतच लाल बहादूर शास्त्री, जयप्रकाश नारायण, मोरारजी देसाई आणि डॉ. राजेंद्र प्रसाद यांसह अनेक नेते त्यांचे अनुयायी बनले. १९५९ मध्ये त्यांनी विश्वायतन योग आश्रमाची स्थापना केली. त्याचं उद्घाटन पंतप्रधान जवाहरलाल नेहरू यांच्या हस्ते झालं होतं. कॅथरीन फ्रँक यांनी इंदिरा गांधींचं चरित्र लिहिलं आहे ज्यामध्ये हा उल्लेख करण्यात आला आहे.