Gaza Hamas : इस्रायल आणि हमासमधील सुरू असलेला दोन वर्षांपासूनचा संघर्ष थांबवण्यासाठी शांतता कराराच्या प्रस्तावाच्या पहिल्या टप्प्याला इस्रायल आणि हमासने मंजुरी दिलेली आहे. यामुळे दोन वर्षांपासून सुरू असलेला रक्तरंजित संघर्ष थांबणार असल्याचं बोललं जात आहे. मात्र, असं असतानाच आता एक मोठी माहिती समोर आली आहे.
अमेरिकेच्या परराष्ट्र विभागाने एक मोठा दावा केला आहे. अमेरिकेकडे एक विश्वसनीय अहवाल आला असून त्या अहवालानुसार हमास गाझा पट्टीत नागरिकांवर हल्ला करण्याची योजना आखत असल्याचा दावा अमेरिकेने केला आहे. मात्र, जर असं झालं तर हे पाऊल युद्धविरामाचं उल्लंघन करणारं ठरेल असं अमेरिकेने म्हटलं आहे. या संदर्भातील वृत्त एनडीटीव्हीने दिलं आहे.
अमेरिकेच्या परराष्ट्र विभागाने एका निवेदनात म्हटलं आहे की, “पॅलेस्टिनी नागरिकांवर हा नियोजित हल्ला युद्धबंदी कराराचं थेट आणि गंभीर उल्लंघन असेल. तसेच मध्यस्थींच्या प्रयत्नांद्वारे मिळवलेल्या महत्त्वपूर्ण शांतता कराराच्या प्रगतीला धक्का असेल. जर हमासने हा हल्ला केला तर गाझाच्या लोकांचं संरक्षण करण्यासाठी आणि युद्धबंदीची अखंडता जपण्यासाठी उपाययोजना केल्या जातील”, असा इशारा अमेरिकेने दिला आहे.
पण या उपाययोजना काय असतील? याबद्दल निवेदनात अधिक तपशील देण्यात आलेला नाही. दरम्यान, राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी गेल्या आठवड्यात हमासला धमकी दिली होती. ट्रम्प यांनी म्हटलं होतं की, “जर हमास गाझामध्ये हल्ला करत राहिला तर शांतता करारांचं उल्लखन समजून आमच्याकडे आत जाऊन त्यांना मारण्याशिवाय पर्याय राहणार नाही”, अशा कडक शब्दांत ट्रम्प यांनी त्यांच्या ट्रुथ सोशल मीडियावरील पोस्टमधून इशारा दिला होता.
युद्धबंदी कराराचा पहिला टप्पा कसा काम करेल?
गेल्या आठवड्यात हमास आणि इस्रायलमध्ये टप्प्याटप्प्याने शांतता करार झाला. ज्यामध्ये इस्रायलने ७ ऑक्टोबर २०२३ रोजी झालेल्या हल्ल्यानंतर पॅलेस्टिनी गटाच्या ताब्यात असलेल्या ओलिसांची सुटका करण्याच्या बदल्यात गाझामधील लष्करी हल्ले थांबवले. कराराचा पहिला टप्पा ज्यामध्ये जिवंत ओलिसांची सुटका आणि मृतांचे अवशेष परत करण्याचा समावेश आहे. या करारानुसार हमासने आणि इस्रायलने एकमेकांच्या काही ओलिसांची सुटका केली आहे.