Crime News : देशभरात खोट्या बॉम्ब स्फोटाच्या धमक्या दिल्याप्रकरणी चेन्नई येथील एका महिलेला अटक करण्यात आली आहे. या प्रकरणात गेल्या अनेक दिवसांपासून तपास सुरू होता. कधीकाळी ज्या पुरुषाबरोबर लग्न करायचे होते त्यालाच फसवण्यासाठी या महिलेने गुजरातमध्ये वेगवेगळ्या २१ ठिकाणी धमकी देणारे ईमेल पाठवल्याचा आरोप आहे. या महिला अभियंतीचे नाव रेने जोशिल्दा असे असून ती चेन्नईतील एका मल्टीनॅशनल कंपनीत वरिष्ठ सल्लागार आहे.
रेने जोशिल्दाचे दिविज प्रभाकर याच्यावर प्रेम होते. पण त्याने या वर्षाच्या सुरुवातीला दुसर्याच एका महिलेबरोबर लग्न केले. हा नकार पचवू न शकल्याने आपले तंत्रज्ञान क्षेत्रातील ज्ञान वापरून तिने खोटी माहिती पसरवण्यास सुरूवात केली, असे पोलिसांनी सांगितले.
“तिचे दिविज प्रभाकर याच्यावर प्रेम होते आणि तिला त्याच्याबरोबर लग्न करायचे होते पण पण हे प्रेम एकतर्फीच राहिले. फेब्रुवारी महिन्यात प्रभाकरने दुसर्या महिलेशी लग्न केल्यानंतर हीचं स्वप्न भंगलं, ज्यामुळे तिच्या मनात द्वेष आणि सूडाची भावना निर्माण झाली,” असे असे सह पोलिस आयुक्त (गुन्हे) शरद सिंघल म्हणाले.
तपास करणाऱ्या अधिकाऱ्यांनी सांगितले की, रेने जोशिल्दा हिने बनावट ईमेल आयडी, व्हिपीएन, व्हर्चुअल नंबर्स आणि डार्क वेबचा वापर करून गुजरातमधील नरेंद्र मोदी स्टेडियम, बीजे मेडिकल कॉलेज आणि अहमदाबादमधील अनेक शाळांसह अनेक महत्त्वाच्या सार्वजनिक ठिकाणी बॉम्बस्फोट घडवून आणण्याची धमकी देणारे बनावट ईमेल पाठवले.
“त्याला अडकवण्याच्या हेतून तिने वेगवेगळे ईमेल आयडी तयार केले, ज्यापैकी काही प्रभाकरच्या नावाने होते,” अशी माहिती पोलिसांनी दिली आहे.
नेमकं काय झालं?
एका शाळेने त्यांना पाठवण्यात आलेल्या ईमेलच्या आधारे ३ जून रोजी अहमदाबाद येथील सारखेज पोलीस ठाण्यात दाखल केलेल्या एका एफआयआरने या प्रकरणाची सुरूवात झाली. त्यानंतर पुढील काही दिवसात असे अनेक ईमेल समोर आले, ज्यामध्ये वेगवेगळ्या संस्थांमध्ये बॉम्ब लपवल्याचा दावा करण्यात आला होता.
ज्यापैकी एका ईमेलमध्ये म्हटले होते की, “नरेंद्र मोदी स्टेडियममध्ये यशस्वीरित्या बॉम्ब पेरण्यात आला आहे. तुम्हाला शक्य असेल तर स्टेडियम वाचवा.”
ईमेलमध्ये अहमदाबाद विमान दुर्घटनेचाही उल्लेख
इतकेच नाही तर आणखी एका ईमेलमध्ये अहमदाबाद विमान दुर्घटनेचा संदर्भ देखील देण्यात आला होता.”जसे की आम्ही काल तुम्हाला मेल पाठवला होता, आम्ही आपले माजी मुख्यमंत्री असलेले एअर इंडियाचे विमान पाडले…आता आम्ही थट्टा करत नसल्याचे तु्मच्या लक्षात आले असेल,” असे म्हटले होते.
१२ राज्यातील व्हिआयपी दौरे आणि धार्मिक सणांच्या वेळ गाठून असे ईमेल पाठवल्याचा रेने जोशिल्दा वर आरोप आहे. तिने महाराष्ट्र, दिल्ली, राजस्थान, तामिळनाडू आणि केरळ या राज्यांमध्ये ईमेल पाठवले. तिने ओळख लपवून ठेवण्यासाठी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर केला तरीही अखेर तिच्या काही लहान तांत्रिक चुकांमुळे ओळख उघड झाली.
“आम्ही तिचा खूप दिवसांपासून मागोवा घेत होतो. तिने खूप हुशारी दाखवली आणि तिचा व्हर्चुअल ट्रेल उघड केला नाही, पण तिच्या लहानशा चुकीमुळे आम्ही तिला शोधून काढलं आणि तिला तिच्या चेन्नई येथील घरातून पकडण्यात आले,” असे पोलिसांनी सांगितले.