Delhi UPSC Aspirant Murder: दिल्लीच्या गांधी विहार परिसरात काही दिवसांपूर्वी यूपीएससी परीक्षेची तयारी करणाऱ्या ३२ वर्षीय रामकेश मीणाचा मृतदेह जळाल्याच्या अवस्थेत सापडला होता. सुरुवातीला हा अपघात असल्याचे वाटत होते. मात्र दिल्ली पोलिसांनी खोलवर तपास केल्यानंतर मीणाची हत्या झाल्याचे निष्पन्न झाले. पोलिसांनी या हत्येप्रकरणात त्याची लिव्ह-इन-पार्टनर, तिचा जुना प्रियकर आणि आणखी एका तरूणाला अटक केली आहे.

रामकेश मीणा याची तिघांनी मिळून हत्या केली. नंतर या हत्येला अपघात असल्याचे भासविण्यासाठी त्यांनी फ्लॅटला आग लावली. सुरुवातीला एअर कंडिशनरचा स्फोट झाल्याचे मानले गेले. मात्र नंतर हा काळजीपूर्वक रचलेला कट असल्याचे समोर आले. सदर फ्लॅटमध्ये रामकेश मीणा एकटाच राहत होता. ६ ऑक्टोबर रोजी त्याच्या फ्लॅटमध्ये आग लागल्यानंतर पोलीस आणि अग्निशमन अधिकारी घटनास्थळी पोहोचले. आग विझल्यानंतर तेथे मीणाचा मृतदेह आढळून आला.

मीणाचा मृतदेह आढळल्यानंतर तीन आठवड्यांनी पोलिसांना प्रकरण उलगडण्यात यश आले. २१ वर्षीय लिव्ह-इन पार्टनर अमृता चौहान, तिचा माजी प्रियकर सुमित कश्यप (२७) आणि त्यांचा मित्र संदीप कुमार (२९) यांना ताब्यात घेण्यात आले आहे. तिघेही उत्तर प्रदेशमधील मुरादाबादचे रहिवासी आहेत.

पोलिसांनी या प्रकरणाचा तपास करत असताना इमारतीचे सीसीटीव्ही फुटेज तपासले असता ५ ऑक्टोबरच्या रात्री मुखवटा घातलेले दोघे जण इमारतीत प्रवेश करताना दिसले. आग लागण्याच्या काही क्षण आधी पहाटे २.५७ वाजता एक तरूणी त्या दोघांपैकी एकासह बाहेर पडताना दिसली.

संशयित तरूणीचे मोबाइल लोकेशन तपासले असता ती घटनास्थळी उपस्थित असल्याचे निष्पन्न झाले. पोलिसांना संशय आल्यानंतर त्यांनी मुरादाबादमध्ये छापे टाकले आणि १८ ऑक्टोबर रोजी तरूणीला ताब्यात घेतले. चौकशीदरम्यान आरोपी अमृता चौहानने गुन्ह्याची कबुली दिली. तसेच तिला मदत करणाऱ्या दोन सहकाऱ्यांचीही तिने नाव सांगितले. यानंतर पोलिसांनी त्यांनाही अटक केली.

आक्षेपार्ह व्हिडीओमुळे हत्या?

रामकेश मीणाच्या हत्येचा उद्देश पोलिसांनी जाणून घेतला असता धक्कादायक माहिती समोर आली. आरोपी तरूणीने सांगितले की, रामकेश मीणाने तिचे आक्षेपार्ह व्हिडीओ गुप्तपणे रेकॉर्ड केले होते. ते डिलीट करण्यास त्याने नकार दिला होता. यानंतर याची माहिती अमृताने तिच्या माजी प्रियकराला दिली. यानंतर रामकेशच्या हत्येचा कट रचण्यात आला.

५ ऑक्टोबरच्या रात्री तिघांनी रामकेश मीणाचा गळा दाबून खून केला. त्यानंतर त्याच्या शरीरावर तेल, तूप आणि दारू ओतली. त्यानंतर गॅस सिलिंडर व्हॉल्व्हचा वापर करून आग लावली. तत्पूर्वी तिघेही जण रामकेश मीणाचा लॅपटॉप, हार्ड डिस्क आणि इतर मौल्यवान वस्तू घेऊन पळून गेले. पोलिसांनी इलेक्ट्रॉनिक उपकरणांसह अनेक मौल्यवान वस्तू पुन्हा मिळवल्या आहेत.