वेणीकापू टोळीची सदस्य असल्याच्या संशय

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

सध्या उत्तर प्रदेश, हरयाणा, राजस्थान या भागांत वेणी कापण्याचे कथित प्रकार घडले असून, झारखंडमध्ये साहिबगंज जिल्हय़ात वेणी कापणाऱ्या टोळीतील असल्याच्या संशयावरून एका महिलेला जमावाने ठेचून ठार मारले. या टोळीचे असल्याचा संशय घेऊन शनिवारी तीन जणांवर  हल्ला करण्यात आला होता, पण त्यांची सुटका करण्यात यश आले होत, असे पोलिस अधिकाऱ्यांनी सांगितले.

पोलिस अधीक्षक पी. मुरुगन यांनी सांगितले, की जमावाने वेणीकापू टोळीतील असल्याच्या संशयावरून काही जणांना ताब्यात घेतले व त्यात एका महिलेचाही समावेश होता. या सर्वावर वेणी कापण्याच्या कृत्यात सामील असल्याचे समजून हल्ला करण्यात आला. या वेळी पोलिस घटनास्थळी गेले व त्यांनी तिघांना वाचवले व जखमी महिलेला रुग्णालयात दाखल केले त्या वेळी तिचा उपचार घेत असताना मृत्यू झाला. पोलिसांनी या जमावाला पांगवण्यासाठी छडीमार केला, पण तोपर्यंत या चौघांना गंभीर मारहाण झालेली होती. खरेतर साहिबगंज जिल्हय़ात वेणी कापण्याचा एकही प्रकार घडलेला नसताना हा हल्ला करण्यात आला. वेणी कापण्याच्या केवळ अफवा आहेत असे त्यांनी सांगितले. वेणी कापण्याच्या कथित घटनेच्या संशयावरून महिलेस ठार मारल्याच्या संदर्भात झारखंडचे मुख्यमंत्री रघुबर दास यांनी तीव्र चिंता व्यक्त केली आहे. दास यांनी लोकांना अफवांवर विश्वास ठेवू नये, तसेच कायदा हातात घेऊ नये, असे आवाहन केले आहे. दोषी व्यक्तींवर कठोर कारवाई करण्याचे आदेश त्यांनी दिले आहेत. मारल्या गेलेल्या महिलेच्या १४ वर्षीय मुलाची सरकार काळजी घेईल असे दास यांनी सांगितले. पूर्व सिंगभूम जिल्हय़ात वेणी कापण्याच्या घटना घडल्याच्या अफवा पसरल्याने पोलिसांनी सरपंच व लोक प्रतिनिधींची बैठक घेऊन या बाबत सविस्तर माहिती देत या घटना खोटय़ा असल्याचे सांगितले.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Woman murdered in jharkhand
First published on: 22-08-2017 at 03:16 IST