Gujarat Crime News : गुजरातच्या गांधीनगर येथील सत्र न्यायालयाने शुक्रवारी एका २५ वर्षीय महिलेला २ वर्षांची शिक्षा सुनावली आहे. या महिलेने बाळाचा जन्म लपवून त्या बाळाच्या मृतदेहाची विल्हेवाट लावल्याच्या प्रकरणात न्यायालयाने दोन वर्षांच्या तुरुंगवासाची ही शिक्षा सुनावली आहे. या महिलेने तिच्या नवजात बाळाला नवव्या मजल्यावरून फेकून दिल्याचा आरोप करण्यात आला होता. या प्रकरणात मागील काही महिन्यांपासून न्यायालयात सुनावणी सुरू होती. मात्र, या महिलेविरुद्ध खुनाचे आरोप सिद्ध होऊ शकले नाहीत.
नेमकं प्रकरण काय?
चांदखेडा परिसरातील एका सोसायटीमधील रहिवाशांना १९ एप्रिल २०२३ रोजी एका नवजात मुलाचा मृतदेह नवव्या मजल्यावरून खाली फेकल्याचं आढळून आलं होतं. या प्रकरणात पोलिसांना असं आढळून आलं होतं की, नवव्या मजल्यावरील बाथरूममधून या नवजात मुलाला फेकून देण्यात आलं होतं. त्यानंतर या प्रकरणात आरोपी महिलेवर भारतीय दंड संहितेच्या कलम ३०२ (खून) आणि ३१८ (मृतदेहाची विल्हेवाट लावून जन्म लपवणे) गुन्हा दाखल झाला होता.
दरम्यान, या संपूर्ण प्रकरणाची न्यायालयात सुनावणी पार पडली. यावेळी सरकारी वकिलांनी २१ साक्षीदारांची तपासणी केली आणि आरोपी महिला मृत बाळाची आई असल्याचं सिद्ध करण्यासाठी विविध वैद्यकीय आणि वैज्ञानिक पुरावे न्यायालयात सादर करण्यात आले. तसेच आई आणि वडिलांची ओळख पटवण्यात आली. मात्र, तरीही आरोपी महिलेने बाळाची हत्या केली असल्याचं सिद्ध होऊ शकलं नाही.
दरम्यान, आरोपी महिलेने बाळाची हत्या केल्याचं सिद्ध होऊ न शकल्यामुळे न्यायालयाने आरोपी महिलेला हत्येच्या आरोपातून निर्दोष मुक्त केलं. यावेळी न्यायालयाने म्हटलं की, “संपूर्ण पुराव्यांचा विचार करता आरोपीने नवजात बाळाला मारण्याच्या उद्देशाने हे कृत्य केलं हे दर्शवणारा कोणताही पुरावा रेकॉर्डवर आलेला नाही. त्यामुळे या महिलेला न्यायालयाने फक्त कलम ३१८ अंतर्गत दोषी ठरवलं आणि तिला दोन वर्षांची शिक्षा सुनावली.