Women Journalists Denied Entry To Taliban Press Conference Priyanka Gandhi Slams PM Narendra Modi: तालिबानचे नेते आणि अफगाणिस्तानचे परराष्ट्रमंत्री अमीर खान मुत्ताकी सध्या भारत दौऱ्यावर आहेत. यादरम्यान काल त्यांनी पत्रकार परिषद घेतली होती. या पत्रकार परिषदेत महिला पत्रकारांना प्रवेश नाकारल्यामुळे मोठा वाद निर्माण झाला आहे. काँग्रेस खासदार प्रियांका गांधी यांच्यासह अनेक नेत्यांनी या घटनेवर जोरदार टीका केली आहे. प्रियांका गांधी यांनी या प्रकरणी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भूमिका स्पष्ट करावी, अशी मागणी केली आहे.

केरळच्या वायनाडमधून खासदार असलेल्या प्रियांका गांधी यांनी एक्सवर केलेल्या पोस्टमध्ये म्हटले आहे, “पंतप्रधान नरेंद्र मोदीजी, कृपया तालिबानच्या प्रतिनिधीच्या भारत भेटीदरम्यानच्या पत्रकार परिषदेतून महिला पत्रकारांना प्रवेश नाकारल्याच्या घटनेबाबत तुमची भूमिका स्पष्ट करा.”

“जर महिलांच्या हक्कांबाबतची तुमची भूमिका केवळ निवडणूक जिंकण्यासाठीचा दिखावा नसेल, तर मग भारतातील सर्वांत सक्षम महिलांपैकी असलेल्या महिला पत्रकारांचा अपमान कसा काय होऊ दिला?”, असा प्रश्नही प्रियांका गांधी यांनी केला आहे.

शुक्रवारी तालिबानचे नेते आणि अफगाणिस्तानचे परराष्ट्रमंत्री अमीर खान मुत्ताकी यांनी घेतलेल्या पत्रकार परिषदेत काही मोजक्या पत्रकारांचाच सहभाग होता, तर एकही महिला पत्रकार नव्हती. परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांच्याशी बैठक झाल्यानंतर काही तासांतच अमीर खान मुत्ताकी यांनी नवी दिल्लीतील अफगाण दूतावासात ही पत्रकार परिषद घेतली होती.

या पत्रकार परिषदेत एकूण २० पत्रकार उपस्थित होते, परंतु त्यामध्ये एकाही महिला पत्रकाराचा समावेश नव्हता. विविध माध्यमांनी दिलेल्या वृत्तानुसार, मुत्ताकी आणि अफगाण दूतावासाच्या अधिकाऱ्यांनीच महिला पत्रकारांचा पत्रकार परिषदेत समावेश न करण्याचा निर्णय घेतला होता.

प्रियांका गांधी यांच्यासह, तृणमूल काँग्रेसच्या खासदार महुआ मोइत्रा यांनीही या घटनेवर टीका केली आहे. एक व्हिडिओ प्रसिद्ध करत महुआ मोइत्रा म्हणाल्या की, “सरकारने महिला पत्रकारांना वगळून तालिबानच्या परराष्ट्रमंत्र्यांना भारतात पत्रकार परिषद घेण्याची परवानगी कशी दिली? एस. जयशंकर यांच्यासारख्या परराष्ट्रमंत्र्यांनी हे मान्य केले, हे कसे शक्य आहे? त्यांनी अशा अटी स्वीकारण्याची हिंमत कशी केली? तथाकथित पुरुष पत्रकार गप्प का राहिले?”

या घटनेवर संताप व्यक्त करत माजी केंद्रीय गृहमंत्री पी. चिदंबरम यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्सवर लिहिले की, “तालिबानचे परराष्ट्रमंत्री अमीर खान मुत्ताकी यांच्या पत्रकार परिषदेतून महिला पत्रकारांना वगळण्यात आल्याचे ऐकून मला धक्का बसला. माझे वैयक्तिक मत असे आहे की, जेव्हा पुरुष पत्रकारांना महिला पत्रकारांचा समावेश नसल्याचे कळले, तेव्हा त्यांनी पत्रकार परिषदेवर बहिष्कार टाकायला हवा होता.”