International Yoga Day 2025: आज ११ वा आंतरराष्ट्रीय योग दिन देशभरात मोठ्या उत्साहात साजरा केला जात आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी विशाखापट्टनम येथे योग दिनाच्या कार्यक्रमात सहभाग घेतला. यावेळी त्यांनी म्हटले की, तणाव, अशांतता आणि अस्थिरतेतून जात असलेल्या जगाला योगातून शांततेती दिशा मिळू शकेल.

पंतप्रधान मोदी यावेळी म्हणाले, दुर्दैवाने आज संपूर्ण जग तणाव आणि अशांततेतून जात आहे. अनेक देशांत अस्थिरता वाढत आहे. अशा परिस्थितीत योग आपल्याला शांततेचा मार्ग दाखवू शकतो. योग असे बटण आहे, जे मानवाला श्वास घेण्यासाठी, संतुलन राखण्यासाठी आणि पुन्हा नव्या दमाने पुढे जाण्यासाठी क्षणभर विश्रांती प्राप्त करून देतो.

“आज ११ व्यांदा संपूर्ण जगभरात योग दिन साजरा केला जात आहे. योगचा साधा अर्थ होतो जोडले जाणे. योगमुळे संपूर्ण विश्वाला जोडले आहे, हे पाहणे सुखद आहे. मी दशकभरापासून योग दिनाच्या यात्रेला पाहतो, तेव्हा खूप काही आठवणी डोळ्यासमोर येतात. संयुक्त राष्ट्रात जेव्हा भारताने २१ जून हा आंतरराष्ट्रीय योग दिन साजरा केला जावा, असा प्रस्ताव मांडला तेव्हा कमीत कमी वेळात १७५ देशांनी या प्रस्तावाला पाठिंबा दर्शविला. या प्रस्तावासाठी झालेली एकजूट ही काही सामान्य घटना नव्हती. हा फक्त एका प्रस्तावाला समर्थन देण्याचा विषय नव्हता, तर मानवतेसाठी केलेला हा एक सामूहिक प्रयत्न होता”, असेही पंतप्रधान मोदी यावेळी म्हणाले.

पंतप्रधान मोदी पुढे म्हणाले की, जगाला माझी विनंती आहे की, हा योग दिनाच्या निमित्ताने मानवतेसाठी २.० ची सुरुवात करुया. जिथे आंतरिक शांतता हे जागतिक धोरण बनू शकेल.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

लठ्ठपणाच्या आव्हानाचा सामना करू

आंतरराष्ट्रीय योग दिनाच्या निमित्ताने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी निरोगी जीवनशैली जगण्याचा संदेश देत असताना लठ्ठपणाच्या विरोधात लढाई लढण्यास सांगितले. ते म्हणाले, “संपूर्ण जगासमोर लठ्ठपणाच्या समस्येचे आव्हान उभे राहिले आहे. मी मन की बात या कार्यक्रमातही यावर बोललो होतो. आपल्या जेवणातून १० टक्के तेल कमी करण्याचे चॅलेंज मी दिले होते. मी पुन्हा एकदा देश आणि जगातील लोकांना हे चॅलेंज पुन्हा देत आहे. आपल्या जेवणातून आपण १० टक्के तेल कसे कमी करू शकू? याबाबत जागरुकता निर्माण करावी लागेल. तेलाचे सेवन कमी करणे, आरोग्यास अपायकारक असलेल्या खाद्यपदार्थांपासून दूर राहणे आणि नित्य योग करणे, हे निरोगी आयुष्याचे चांगले औषध आहे.”