योगी आदित्यनाथ हे मुख्यमंत्री झाल्यापासून उत्तर प्रदेशातील कायदा आणि सुव्यवस्थेची घडी नीट बसवण्याचे काम करत आहेत. गेल्या चार दिवसात त्यांनी १०० पेक्षा अधिक पोलीस कर्मचाऱ्यांना निलंबित करण्याचे आदेश दिले आहेत. निलंबित झालेले कर्मचारी हे गाजियाबाद, मेरठ आणि नोएडा या भागातील आहेत. तसेच लखनौमधील सात अधिकाऱ्यांना देखील डीजीपी जावेद अहमद यांच्या आदेशानुसार त्यांच्यावर कारवाई करण्यात आली आहे. हे सात पोलीस निरीक्षक कामात दिरंगाई करत होते त्यामुळे त्यांना निलंबित करण्यात आले अशी माहिती अहमद यांनी दिली.

जे लोक आपल्या कामात दिरंगाई करत आहेत, टाळाटाळ करत आहेत त्या अधिकाऱ्यांना शोधा आणि त्यांच्यावर कारवाई करा असे आदेश आदित्यनाथ यांनी दिले होते. त्यांच्या या आदेशाचे पालन अहमद यांनी केले. आदित्यनाथ यांनी पदभार स्वीकारताच डीजीपी अहमद आणि देवाशीष पंडा (गृह सचिव ) यांनी एक व्हिडिओ कॉन्फरंस घेतली. या कॉन्फरंस द्वारे सर्व अधीक्षकांना आपल्या क्षेत्रात करडी नजर ठेवण्याचे आवाहन करण्यात आले. राज्यातील कायदा आणि सुव्यवस्था चोख राहिली पाहिजे असे आदेश त्यांना देण्यात आले.

जर कुणी काम करत नसेल तर त्यावर कारवाई करा असे देखील त्यांना सांगण्यात आले. हे आदेश दिल्यानंतर सर्व अधिकारी आणि कर्मचारी वेळेवर हजर राहत आहेत असे डीजीपींनी सांगितले. त्या व्यतिरिक्त ते कडक शिस्तीचे पालन करत आहेत की नाही यावर देखील लक्ष ठेवावे असे निर्देश देण्यात आले आहे. ज्या अधिकाऱ्यांचा गणवेश अस्वच्छ आहे, कामावर असताना पानमसाला खात असतील, डोक्यावर टोपी नाही, कामावर असताना फोनवर बोलत असतील, पेपर वाचत असतील तर त्यांना तसे न करण्याच्या सूचना देण्यात येत आहेत. सतत सतर्क राहणे हे तुमचे आद्यकर्तव्य तेव्हा याचे पालन तुम्ही करा असे आदेश देण्यात आले आहे. सरकारी कर्मचाऱ्यांनी गुटखा, पानमसाला खाऊन कामावर येऊ नये. आवारात थुंकू नये असे आदेश देखील आदित्यनाथ यांनी दिले आहे.